वाहतुक व्यवस्था खास; पर्यटन स्थळांचा विकास!

* अर्थसंकल्पात ठाणे शहरासह जिल्ह्याला न्याय
* चार चाकी वाहने महागणार
* पाच वर्षांत वीज दर कमी होणार

मुंबई: महायुती सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प ठाणे जिल्ह्यासह राज्याच्या विकासाला वेग देणारा दिसून येत आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, भुयारी मार्ग यासह आजूबाजूच्या शहरांना जोडणारे महामार्ग या प्रकल्पांसाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून मुरबाड येथील माळशेज घाटाचे पर्यटन आणखी आकर्षक करण्याचा संकल्प यात समाविष्ट करण्यात आला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे 99 टक्‍के काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64 हजार 755 कोटी रुपये खर्च झाला आहे. ⁠इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. ⁠या महामार्गालगत अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील.

वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. ठाणे येथे 200 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयाचे काम सुरू असल्याची माहितीही श्री.पवार यांनी दिली.

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व इतर महत्त्वाची शहरं विमानतळाशी जोडली जाणार आहेत. तसेच, बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी १३.४५ किमी असून त्याचे ३,३६४ कोटींचे खर्चाचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवे येथे 1,160 हेक्टर क्षेत्रामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन माल वाहतुकीची क्षमता असणार आहे. ⁠या प्रकल्पाचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून चाचणी उड्डाणेही यशस्वीरीत्या पार पडली आहेत, ⁠तेथून एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थापना करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्‍या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्यात येणार आहे. त्यासाठी 8,200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

चार चाकी वाहने महागणार

30 लाख रुपये आणि त्याहून जास्त किमतीच्या महागड्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के कर आकारण्यात येणार आहे. तर इतर चार चाकी वाहन कराचा दर १ टक्क्याने वाढवण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

वीजदर कमी होणार
येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होतील. महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील, असे अजित पवार म्हणाले.