बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला करोना संसर्ग झाला आहे. तो सध्या कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात उपचार घेत आहे. सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. काल रात्री उशिरा गांगुलीची करोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुली यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हाती येत आहे. गेल्या वर्षी सौरव गांगुलीला हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्याला वुडलँड्स रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यावेळी महिन्याभरात दोन अँजिओप्लास्टी करण्यात आल्या होत्या.