टीएमटीला सोसवेना रोज १५ लाखांचा तोटा

यंदाही पसरावे लागणार महापालिकेकडे हात

ठाणे : गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या परिस्थितीमुळे ठाणे परिवहनची आर्थिक परिस्थिती खालावली असून दररोज १५ लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी परिवहनला यंदा पुन्हा महापालिकेकडे हात पसरावे लागणार आहेत.

मागील वर्षी सादर केलेल्या अंदाज पत्रकात परिवहनने २८४.६३ कोटी अनुदानाची मागणी महापालिकेकडे केली होती. परिवहन समितीने यावर साधक बाधक चर्चा करुन या अनुदानाच्या रकमेत वाढ करुन पालिकेकडून ३०२.४१ कोटींची मागणी केली होती. परंतु पालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पात परिवहनसाठी १२२.९० कोटी प्रस्तावित करुन परिवहनच्या तोंडाला पाने पुसली होती.

कोरोनाच्या काळात परिवहनला दिवसाला तीन ते पाच लाखांचेच उत्पन्न मिळत होते. परंतु आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर परिवहनला दररोज २० ते २२ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. परंतु मधल्या काळात म्हणजेच कोरोनापूर्वी परिवहनला २५ ते २७ लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यानुसार आजही उत्पन्न कमीच असल्याचेच स्पष्ट होत आहे. दुसरीकडे परिवहनच्या बसेसमधून दीड लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत आहेत. परिवहनचे उत्पन्न जरी २२ लाखांच्या घरात असले तरी परिवहनचा रोजचा खर्च हा सुमारे ३५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे परिवहनला रोजच्या रोज १५ लाखांच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. परिवहनच्या ताफ्यातून आजच्या घडीला २५० बसेस रस्त्यावर धावत असल्या तरी देखील बसेस दुरुस्तीसाठीचे प्रमाण हे १५० हून अधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा देखील परिवहनला उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना कसरत करावी लागणार आहे.

केंद्र सरकारतर्फे पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी महापालिकांना विविध उपाययोजना करण्याकरिता करोडो रुपयांचा निधी दिला जातो. या ३८ कोटींच्या निधीतून ८१ इलेक्ट्रिक बसेस विकत घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.