अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित होताच हा सिनेमा चर्चेत आला. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांत रिलीज झालेल्या या भव्यदिव्य सिनेमाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. समीक्षकांनी या चित्रपटाला भरभरून दाद दिलीये. चित्रपटात वृत्तवाहिन्यांमधील पत्रकारितेचा पर्दाफाश करण्यात येऊन सर्वच समीक्षकांनी खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवत या चित्रपटाला प्रामाणिक दाद दिली आहे. प्रेक्षकांमध्येही दांडगा उत्साह दिसून येतोय. सोशल मीडियावर या चित्रपटाचं चांगलंच कौतुक होतंय. महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचं वातावरण असल्यामुळे चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला फटका बसला आहे. पण प्रेक्षकांचा उत्साह बघता, येत्या वीकेंडला हा सिनेमा चांगला बिझनेस करेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.
चित्रपटाची कथा भडक मेकअप किंवा शो शायनिंग न करता साधेपणानं काम करणाऱ्या शेफाली नावाच्या नवख्या टिव्ही पत्रकाराभोवती गुंफण्यात आली आहे. एका छोट्याशा वाहिनीसाठी काम करणारी शेफाली टीव्ही पत्रकारितेतील वाघ अशी ओळख असणाऱ्या अश्विनला आदर्श मानत असते. अश्विनला भेटल्यावर मात्र तिचा गैरसमज दूर होतो. अश्विन तिचा अपमान करतो. अश्विननं दिलेलं चॅलेंज स्वीकारून आपल्या ध्येयाच्या दिशेनं झेपावण्यास सज्ज झालेली शेफाली रिक्षातून जात असताना एका टॉवरवरून खाली पडलेली मुलगी तिला दिसते. ही खळबळजनक बातमी दिल्यानं एकीकडं शेफालीचं चौफेर कौतुक होतं, तर दुसरीकडं अश्विनचा टीआरपी घसरतो. त्यानंतर तमाशाचा फड कसा रंगतो ते पहायला मिळतं.