मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील समस्यांचे निराकरण

आमदार संजय केळकर यांनी घेतला आढावा

ठाणे: ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी २०१४ रोजी बाळकुम येथे सुरु करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात असुविधांमुळे बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. याविरोधात भाजपने सप्टेंबर महिन्यात आंदोलन छेडल्यानंतर आ.संजय केळकर यांनी उपकुलगुरूंना निर्देश दिले होते. त्यानंतर आ. केळकर यांनी नुकतीच उपकेंद्राची पाहणी करून येथील समस्यांचे निराकरण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

ठाणे शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आबाळ होऊ नये यासाठी ठाण्यातील बाळकुम येथे उभारण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील सुविधांचा बोजवारा उडाल्याने ११ सप्टेंबर रोजी भाजयुमोने जोरदार निदर्शने केली होती. तसेच, सुविधा न पुरवल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनानंतर आमदार संजय केळकर यांनी तत्काळ शासकिय विश्रामगृहात मुंबई विद्यापीठाचे उप कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक घेऊन तातडीने सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, केवळ निर्देश देऊन स्वस्थ न बसता आ.केळकर यांनी, नुकतेच उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. उपकेंद्रातील अंतर्गत रस्ते उभारणी तसेच संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहेत. येथील खेळाचे मैदान विकसित करून व्यायाम शाळेचे साहित्य पुरवण्यासह सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार असुन दुरवस्था बनलेल्या शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करून वापरण्यायोग्य करण्यात आले.वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यावर उपाययोजना म्हणून महावितरणकडून नवीन ट्रान्सफर्मर बसविण्यात आला आहे. उर्वरीत समस्याही आगामी काळात मार्गी लावण्यात येतील असे सुतोवाच आमदार संजय केळकर यांनी करून
तात्काळ संबंधित अधिकारी वर्गाला कार्यवाहीच्या सूचना केल्या.

या प्रसंगी परिवहन सदस्य विकास पाटील,भाजप मंडळ अध्यक्ष ऍड हेमंत म्हात्रे, कैलास म्हात्रे,जैन प्रकोष्ठ संयोजक राकेश जैन, उपकेंद्राचे संचालक अद्वैत वैद्य तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.