‘गोल्डन बॅच’च्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’ची सुविधा द्या

पुर्वेश सरनाईक यांची मुंबई विद्यापीठाकडे मागणी

ठाणे: अभियांत्रीकी शाखेच्या पदवी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश द्यावा, अशी मागणी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मुंबई विद्यापीठाकडे केली.

पुर्वेश सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या विविध मांगण्यांसाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी कुलगुरू उपलब्ध नसल्यामुळे सरनाईक यांनी परिक्षा व पुर्नविल्यांकन विभागाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शिक्षण प्रणालीच्या विविध विषयांवर तसेच विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुंबई विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांबाबत युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांची भेट घेऊन शिक्षणात येणाऱ्या अडचणी आणि समस्या सांगितल्या होत्या. मुख्यत्वे मुंबई विद्यापिठातील अभियांत्रीकी शाखेमध्ये पदवी परिक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षामध्ये विशेष प्रवेश देण्यात यावा म्हणजेच मुंबई विद्यापीठातील अभियांत्रीकी शाखेच्या ’गोल्डन बॅच“च्या विद्यार्थ्यांना ’कॅरी ऑन“ची सुविधा देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. परंतु, या संदर्भात विद्यापीठ कोणताही निर्णय घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी सरनाईक यांची भेट घेऊन विद्यापीठासमोर विद्यार्थ्यांची मागणी मांडण्यासाठी विनंती केली होती. याकरिता आज पुर्वेश सरनाईक यांनी मुंबई विद्यापीठाला भेट देऊन श्री.कारंडे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी पुर्वेश सरनाईक यांनी विद्यापीठाच्या कुलगुरुंशी फोनवर चर्चा करून या विद्यार्थ्यांच्या मागणीबद्दलची माहिती कुलगुरूंना दिली. कुलगुरूंनी सकारात्मक भूमिका घेऊन यासंदर्भात दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय देणार असल्याचे सांगितले. या निर्णयाचा फायदा किमान ४ ते ५ हजार विद्यार्थ्यांना होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या इतर सुखसोयींबद्दलही चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. तसेच यावेळी डिस्टन्स् एज्युकेशन विभागाचे प्रभारी संचालक प्रध्यापक डॉ. संतोष राठोड यांची देखील भेट घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली.

यावेळी युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल, सिनेट सदस्य महादेव जगताप, वैभव थोरात, डॉ. सुप्रिया कारंडे, युवासेना सचिव राहुल लोंढे, नितिन लांडगे, विराज निकम, सचिन मांजरेकर, प्रभूदास नाईक, जितेश गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.