ऐरोली-घणसोली खाडी पुलासाठी ३१६ झाडांवर पडणार कुऱ्हाड

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका घणसोली-ऐरोली दरम्यानच्या सहा पदरी उन्नत पुलाची निर्मिती करणार आहे. या कामासाठी ३५४० खारफुटीची कत्तल होणार असून आता ३१६ झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पात पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहराला ऐरोली ते दिवाळे गाव असा विस्तीर्ण खाडी किनारा लाभला आहे. या खाडी किनाऱ्यावर परदेशी पक्षी फ्लेमिंगो सहित इतर देशी पक्षांचा विहार असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैव विविधता असून मासेमारीतून स्थानिक मच्छीमारांची उपजीविका चालते. याच खाडीतील ऐरोली ते घणसोली दरम्यान नवीन खाडी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे.

सुमारे १९५० मीटर लांबीच्या या खाडीपुलासाठी चार हेक्टर वनजमीन बाधित होणार आहे. पूल आणि जोड रस्ते असे एकूण साडेतीन किलाेमीटरचे काम यात केले जाणार आहे. हा पूल पुढे मुलुंड-ऐरोली खाडीपुलासह ऐरोली-काटई रस्त्याला जोडण्यात येणार आहे. पुलासाठी २५ पिलर टाकण्यात येणार आहेत.

मँग्रोव्ह सेलने डिसेंबर २०२२ मध्ये सादर केलेल्या अहवालानुसार हा पूल ऐरोली, घणसोली येथील १२,१५० चौरस मीटर वनजमिनीतून जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात ३५४० खारफुटीची कत्तल होणार आहे. तर आता याच प्रकल्पात ३१६ झाडे अडथळा ठरत असून त्या झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

घणसोली-ऐरोली खाडी पुलात बाधीत होणाऱ्या खारफुटीच्या बाबतीत कांदळवन विभागाने प्राथमिक अहवाल दिला असून त्या मोबदल्यात
पालघर येथे १७ हजार खारफुटी लावण्यात येणार आहे. या प्रकल्पात जी ३१६ झाडे अडथळा ठरत आहेत त्यांना तोडणे आणि स्थलांतर करणेबाबत मनपा उद्यान विभागाकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती प्रकल्प उप अभियंता
यशवंत कापसे यांनी दिली.