शिवसेनेची पालिकेकडे मागणी
अंबरनाथ: अंबरनाथमधील नागरी समस्यांची त्वरित सोडवणूक न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेला देण्यात आला. अधिकाऱ्यांना मोफत श्रवणयंत्र आणि चष्मावाटप करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मुख्याधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर चष्मावाटप आंदोलन तूर्त मागे घेण्यात आले.
शहरातील पथदिवे, आरोग्य सुविधा तसेच अन्य नागरी समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले आहे, त्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी विकास सोमेश्वर यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चष्मा आणि श्रवण यंत्रे देऊन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनोख्या रितीने आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र विकास सोमेश्वर यांच्या आंदोलनापूर्वीच आज मंगळवारी मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी विकास सोमेश्वर यांच्याशी चर्चा केली. त्यांचे प्रश्न ऐकून घेतले आणि समस्यांचे येत्या 15 दिवसांच्या आत सोडवण्याचे आश्वासन मुख्याधिकारी पराडकर यांनी विकास सोमेश्वर यांना दिले.
शहरातील अनेक समस्यांबाबत नागरिक पालिकेत येतात. मात्र अधिकारी तत्काळ योग्य ती दखल घेत नसल्याचा आरोप विकास सोमेश्वर यांनी केला आहे. शहरातील स्ट्रीट लाईट, अनधिकृत बांधकामे, तसेच इतर नागरी समस्या याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील अधिकारी योग्य ती दखल घेत नसल्याने विकास सोमेश्वर संतप्त झाले होते. त्यामुळे नाईलाजाने पालिका अधिकाऱ्यांना मोफत श्रवण यंत्र आणि चष्मा वाटप करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोमेश्वर यांनी दिला होता.
मुख्याधिकारी पराडकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे मुख्याधिकारी पराडकर यांनी निर्देश दिले. पंधरा दिवसांच्या आतच सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन विकास सोमेश्वर यांना दिले. पंधरा दिवसानंतर कारवाई न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा सोमेश्वर यांनी दिला आहे. यावेळी नगरपालिकेच्या संबंधित खात्याचे अधिकारी तसेच राहुल सोमेश्वर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.