ठाणे : महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडूनही जनतेला उन्हाळ्यात प्रचंड पाणीटंचाई सामोरे जावे लागत असल्याचे महत्वाचे कारण जल व्यवस्थापनाचा अभाव आहे. याकरीता लोकांमध्ये जनजागृतीसाठी पथदर्शी शाश्वत जलव्यवस्थापनाचे प्रकल्प रोटरी क्लब, वसुंधरा संजीवनी मंडळ, महाराष्ट्र वनविभाग आणि ग्रीन आर्च असोसिएट या संस्थांद्वारे गेल्या दोन वर्षांपासून राबविण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यांतील दुर्गम आदिवासी पाड्यांत उन्हाळ्यात दूरदूर पायपीट करावी लागत असल्यामुळे, मुरबाड तालुक्यातील ‘पद्याची वाडी’ हा प्रयोग राबवण्यात आला. रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई इंडस्ट्रियल एरिया आणि एसएफसी एन्व्हार्यमेंटल टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रुफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या माध्यमातून दररोज किमान पाच हजार लिटर पाणी वैज्ञानिकरित्या गाळून ते पिण्यासाठी वापरण्यात येत आहे शिवाय हेच पाणी बोअरवेल आणि कोरड्या विहिरींमध्ये सोडण्यात येत असल्याने आपोआपच भूगर्भातील पाणीसाठ्यातदेखील वाढ होत आहे.
पाणी हे सर्वात महत्त्वाचे अत्यंत दुर्लक्षित संसाधन आहे. पाण्याचा प्रश्न हा इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा भविष्याच्या दृष्टिकोनातून अति महत्वाचा आणि अति संवेदनशील झाला आहे. पाण्याबद्दल दोन घरांपासून दोन देशांपर्यंत अनेक पातळीवर वाद सुरु आहेत. मात्र भारतात जलद याबाबतीत काही पाण्यांच्या स्तोत्रांच्या भौतिक स्थिती संदर्भात काही सांख्यिकी अंदाजाच्या आधारावर केलेल्या योग्य उपाय योजना आढळून येतात. ठाणे जिल्ह्यात तालुका शहापूर अंतर्गत वाडी ग्रामपंचायत वाघिवली येथील अतिदुर्गम आदिवासी वाडी येथे कायम पाण्याची टंचाई भासत असे. स्त्रियांना पाणी भरण्यासाठी किमान एक किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत होती. वाडीतील बोअरवेल मार्च महिन्याअखेरीस कोरडी पडत असे.
रोटरीत विश्वात ‘वॉटर मॅन’ म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ रोटेरियन हेमंत जगताप यांच्या मार्गदर्शनाने व रोटरी क्लब ऑफ मुंबई इंडस्ट्रियल एरिया यांच्या पुढाकाराने ‘ग्रीन आर्च असोसिएटस्’चे अरुण सपकाळे यांच्यामार्फत वर्षा जलसंचयन प्रकल्प ‘पद्याच्या वाडी’ येथे सन २०२१ मध्ये राबविला गेला. या प्रकल्पात वाडीतील समाज मंदिर हॉल जिल्हा परिषद शाळेच्या छताचे साधारण २०० चौरस मीटर क्षेत्रफळातील ४२० घनमीटर पाणी म्हणजेच पावसाळी दर दिवशी पाच हजार लिटर पाणी गोळा करून ऑनलाईन फिल्टरद्वारे अतिरिक्त पाणी बोअरवेलमध्ये पुनर्भरण करण्यात आले. यामुळे यावर्षी मे महिन्यातसुद्धा विहीर व बोअरवेलमध्ये मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध आहे.
अशा या प्रकल्पाची पुनरावृत्ती धसई येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या पुढाकाराने करण्यात आली. १७० मीटर क्षेत्रफळ असलेल्या कार्यालयाचे पावसाचे पाणी टाकीत साठवून अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेल्या बोअरवेलमध्ये पुनर्भरण करण्यात येणार आहे. तद्नंतर दररोज साडेचार हजार लिटर पाणी हे भूगर्भात बोअरवेलद्वारे पुनर्भरण करण्यात येईल.
‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ च्या पुढाकाराने साकडबाव येथील ‘तळ्याची वाडी, पारधवाडी व इतर दोन पाडे ’ यामध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र- साकडबाव येथे वर्षा जल संचयन प्रकल्पाचे काम पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पांमध्ये अस्तित्वात असलेल्या बोअरवेल पुनर्भरण करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याचा ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ चा मानस आहे.
अशाप्रकारे महाराष्ट्रात भूगर्भातील साठे वर्षा जलसंचयनाद्वारे पुनर्भरण करण्यात आले तर राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीप्रश्न कायम स्वरूपी सुटेल, असा विश्वास ज्येष्ठ रोटेरियन हेमंत जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर आणि सपकाळे यांनी व्यक्त केला.