सिटी पार्कच्या जागेवर घनकचऱ्याचे आरक्षण

महासभेत प्रस्ताव; स्थानिकांचा विरोध 

भिवंडी : शहरातील मौजे चाविंद्रा येथे सिटी पार्कच्या जागेत महानगर पालिकेने तात्पुरता बनविलेले घनकचरा व्यवस्थापन आता कायम करण्याकरिता आरक्षण बदल करण्याचे ठरविले असून त्यासाठी बुधवार होणाऱ्या महासभेत ठराव घेण्यात येणार आहे. या ठरावास स्थानिक नागरिकांनी लेखी हरकत घेऊन विरोध केला आहे.

भिवंडी शहराच्या मंजूर विकास योजनेतील मौजे चाविंद्रा  येथील आरक्षण क्र.११५ हा मौजे चाविंद्रा  सर्वे नं. ७ पै,१०६ पै. असे एकूण ६. १० हे. प्रमाणे आरक्षित आहे. महानगरपालिका क्षेत्राची सुधारित विकास योजना १४/०८/२००३ पासून आमलात आली आहे. मात्र पालिकेच्या नगरविकास विभाग आणि  प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने या जागेवर अतिक्रमण होऊ लागले होते. त्यामुळे पालिकेकडे सध्या ५.७५ हे. जागा ताब्यात आहे. शहरात होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया व प्रोसेसिंग करण्यासाठी पालिकेकडे जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मौजे कालवार येथे भराव भूमी /डम्पिंग विकसित करून शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित आहे. असे सांगून सिटी पार्कच्या जागेत तात्पुरता कचऱ्याचा भराव टाकण्याच्या बहाण्याने नियमित कचरा डम्पिंग करण्याचे काम सुरु केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसोबत विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. या डम्पिंग ग्राउंडजवळ पालिकेची चाविंद्रा शाळा असून या दुर्गंधीने या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यातच अनेकवेळा आग लागल्याने लोकवस्तीत धूर गेल्याने नागरिकांना अस्थमाचा त्रास सुरु झाला आहे.

पावसाळ्यात या डम्पिंगमधील कचऱ्यातून वाहणारे केमिकलयुक्त पाणी चाविंद्रा व पोगावमधील शेतात घुसून ही शेती नापीक झाली आहे. या घनकचरा व्यवस्थापनास स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी विरोध केला असून याबाबत पालिका आणि शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. पालिकेत नव्याने आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून पालिकेचे अधिकारी शासनाचा स्वच्छ भारत अभियानासारखे उपक्रम राबवून बक्षिसे मिळवितात.

चाविंद्रा, पोगाव, रामनगर, गायत्रीनगर नागांव येथील लोकवस्तीच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करीत आहेत. नागरिकांच्या स्वास्थाबाबत उपाययोजना न करता पालिका प्रशासनाने सिटी पार्कच्या अर्ध्या जागेचा वापर बदलून घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया केंद्रे करण्याचे ठरविले आहे. त्याकरिता बुधवारी होणाऱ्या महासभेत नगरसेवकांच्या ठरावाची हा विषय ठेवला आहे. ही कारवाई पालिकेने या जागेवर केल्यास पिढ्यानपिढ्या राहणारे रहिवासी व नव्याने झालेल्या लोकवस्तीच्या आरोग्यास धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे या ठरावास परिसरातील नागरिकांनी हरकत घेतली असून या ठरावास विरोध करण्यासाठी जनसंघर्ष उभा केला जाईल, अशी माहिती  भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे जिल्हा अध्यक्ष अनंत पाटील यांनी दिली.