घनकचरा विभागाचे कर्मचारी पेटीवर गैरहजर राहण्यासाठी मोजतात पैसे?

काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा अयोप

ठाणे: घनकचरा विभागाच्या कचरा पेटीवरील कर्मचारी पेटीवर हजर न राहताच फुकटचा पगार घेत आहेत. त्या बदल्यात ते पैसे देत असल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. अशा कर्मचाऱ्यांमुळे ठाणे महापालिकेला महिन्याकाठी सुमारे तीन कोटींचा फटका बसत असल्याचा दावाही त्यांनी केला.

ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिकठिकाणी घनकचरा पेटी निर्माण करण्यात आल्या असून या घनकचरा पेटीवर अनेक कर्मचारी काम करतात. विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील त्यांच्या प्रभागातील घनकचरा पेटीवर ५० कर्मचारी काम करतात. मात्र यातील केवळ १५ कर्मचारीच पेटीवर हजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उर्वरित ३५ कर्मचारी पेटीवर कधीच हजर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हाच कारभार सर्वच कचरा पेटीवर सुरु असेल तर अशाप्रकारे काम न करता फुकटचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ठाणे महापालिकेचे महिन्याकाठी तब्बल अडीच ते तीन कोटींचे नुकसान होत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

या सर्व संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. घनकचरा हजेरी पेटीवरील हा कारभार थांबवण्यासाठी या ठिकाणी दक्षता समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी देखील चव्हाण यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही घोळ

शहरातील कचरा आधी सीपी तलाव या ठिकाणी आणला जातो आणि त्यानंतर हा कचरा दिव्याच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. कळवा, मुंब्रा येथील कचरा सीपी तलाव या ठिकाणी आणलाच जात नसून हा कचरा थेट दिव्याला नेला जात आहे. असे असतानाही सीपी तलावाच्या फेऱ्यांचे बील देखील ठेकेदाराला दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.