नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच सांगितली ‘राज की बात’
मुंबई : मनसेच्या पाठिंब्यांचे राज्यातील महायुतीकडून स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंचे आभार मानले. त्यानंतर, आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, राजकारणातील ‘राज की बात’ सांगितली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजपने सरकार स्थापन केले. त्यानंतर, अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेऊन सत्तेत स्थान दिले. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांसाठी भाजपा बेरजेचं राजकारण करत असल्याचं उघड झालं. त्यातच, मनसेनेनेही पाठिंबा घोषित केल्यामुळे मनसेही अप्रत्यक्षपणे भाजपासोबतच आली आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला होता.
लोकांच्या मनात प्रश्न आहे की, भाजपला विजयाची एवढी खात्री होती तरी त्यांनी राज ठाकरे यांना सोबत का घेतले?, असा प्रश्न मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदींना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरे आम्हाला नवीन नाहीत, असे मोदींनी म्हटले. मी आधी सांगितल्याप्रमाणे देशाला जो सर्वोच्च प्राधान्य देतो, त्याचे आम्ही नेहमीच स्वागत करतो. गेल्या १० वर्षापासून आम्ही स्वबळावर बहुमतात आहोत, मात्र, तरीही आम्ही कायमच नव्या मित्रांचे स्वागत केले आहे. आपल्या लोकशाहीसाठी हे चांगले आहे. अधिकाधिक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकांच्या कल्याणासाठी काम करणे केव्हाही चांगलेच असते, असे मोदींनी म्हटले.
त्यांनी यापूर्वीही आम्हाला पाठिंबा दिला आहे. आम्ही देशासाठी चांगले काम केले आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. आमच्या विचारांना तसेच आमच्या द्वष्टेपणाला ते पाठिंबा देतात. महाराष्ट्राच्या विकासातही ते हातभार लावू शकतील, असे आम्हाला वाटते. त्यामुळे हे एकत्र येणे केवळ सत्तेसाठी किंवा राजकीय गणितांसाठी आहे, असे नाही. लोकसेवेसाठी एकत्र येणे, हा त्यामागचा उद्देश आहे. वस्तुतः देशहितासाठी जो कोणी आमच्याकडे येईल, त्या प्रत्येकाचे आम्ही सहर्ष स्वागतच करू, असे स्पष्टीकरण मोदींनी राज ठाकरेंच्या पाठिंब्याबाबत दिले.
लोकसभा निवडणुकीत मनसे निवडणूक लढवणार नसल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. मात्र, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेण्यास राज यांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार, आत्तापर्यत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील कणकवली, पुणे या दोन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या असून आज कल्याणमध्ये राज यांनी सभा होत आहे. कल्याणमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व ठाण्यातील नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होत आहे.