तुर्भे पोलिसांनी केला पर्दाफाश
नवी मुंबई: मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुर्भे पोलिसांनी सापळा रचून मध्य प्रदेशमधून येणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतले.
कंटेनरमध्ये असलेल्या मालाची तपासणी केली असता, कंटेनरमध्ये सुरुवातीला गव्हाच्या गोणी असल्याचे दिसून आले, मात्र आतील भागात काही संशयास्पद गोणी असल्याचे दिसून आल्याने त्या गोण्यांची तपासणी केली असता २० गोण्यांत जवळपास दहा लाख किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून, चालक आणि वाहकाला अटक केली आहे. त्यांना कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गुटखा कुठून आला, कुणाला दिला जाणार होता, याचा तपास तुर्भे पोलीस करत आहेत, अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.