Thanevaibhav Online
22 September 2023
राष्ट्रवादीने केली चौकशीची मागणी
बदलापूर: बदलापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या धूर फवारणीच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करून याप्रकरणी चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी हा आरोप केला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे उपस्थित होते. बदलापूर नगरपरिषदेत गेल्या तीन वर्षांपासून धुरीकरणाच्या कामाचा ठेका एका संस्थेला देण्यात आला आहे. मात्र धुरीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेने निविदा प्रक्रियेसोबत जोडलेल्या दाखल्यात गंभीर चुका झाल्याचे श्री. देशमुख यांनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले.
धूर फवारणी (धूरीकरण) चे काम केलेले असून संस्थेचे काम समाधानकारक असे ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या दाखल्यात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र या अनुभव दाखल्यासंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर याची पडताळणी करण्यासाठी बदलापूर नगर परिषदेने ठाणे महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला. त्यावेळी ठाणे महानगर पालिकेकडून संबंधित संस्थेला देण्यात आलेल्या अनुभव दाखल्याची प्रत पाठवण्यात आली आहे. त्याचा जावक क्रमांकही एकच आहे, मात्र यामध्ये संस्थेने फायलेरीया विभागात २०१५ ते ते २०१८ पर्यंत भाडेतत्त्वावरील मिनी ट्रॅक्टर वाहनावर औषध फवारणी कामासाठी मनुष्यबळाचा पुरवठा समाधानकारक केला असल्याचे नमूद करण्यात आलेले असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
एखाद्या शासकीय कार्यालयाद्वारे एकाच जावक क्रमांकाने दोन वेगवेगळे दाखले देणे शक्य नाही. आणि बदलापूर नगर परिषदेच्या पत्रानुसार ठाणे महानगरपालिकेचा दाखला खरा आहे. याचाच अर्थ कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने धुरीकरण कामासाठी करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत बनावट अनुभव दाखला जोडण्यात आला असल्याने आपोआपच ही संपूर्ण निविदा प्रक्रिया अवैध ठरली आहे. त्यामुळे याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून धुरीकरण कामासाठी संस्थेला अदा करण्यात आलेली सर्व रक्कम परत घ्यावी, अशी मागणी असल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले.
यासंदर्भात १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुळगाव बदलापूर नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. नगरपालिकेत प्रशासकीय राजवटीत मनमानी कारभार सुरू असून गैरप्रकार खपवून घेणार नाही. त्याविरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा शहराध्यक्ष वडनेरे यांनी दिला.