अनियमित वीज पुरवठ्यामुळे ठाण्यातील लघुउद्योग संकटात

चार महिन्यांत ११६ तास वीज खंडीत

ठाणे: या वर्षात एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल ११६ तास वीजपुरवठा खंडीत झाल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उद्योग ठाण्यातून हलवायचे का, असा संतापजनक प्रश्न ठाण्यातील उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

ठाणे शहरात ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजेच टीसाच्या माध्यमातून महावितरण आणि उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाणे, पनवेल, शहापूर, कल्याण आदी भागातील सुमारे ५० उद्योजक आणि महावितरण अधिकारी यावेळी उपस्थित होते. ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसर हा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी लघू आणि मध्यम उद्योजक अनेक अडचणींचा सामना करत आपला उद्योग सांभाळत आहेत. त्यात आता
आयटी पार्कची भर पडली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्याला वारंवार वीज खंडीत होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी या
बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठयामुळे उद्योगांना फटका बसत असल्याची कैफियत यावेळी उद्योजक-कारखानदारांनी मांडली. १ एप्रिल ते २९ जुलै या कालावधीत तब्बल ११६ तास वीज पुरवठा खंडीत झाला असल्याची माहिती यावेळी उद्योजकांनी दिली. त्यामुळे मोठया नुकसानाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती टीसाचे अध्यक्ष संदीप पारीख यांनी दिली.

कल्याण, शहापूर आदी भागामध्ये ही समस्या आणखी जटील होत चालली आहे. आधीच उद्योगांसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण नसताना आता वीज पुरवठा नियमित होत नसल्याने आम्ही सुद्धा आमचे कारखाने इतर राज्यात स्थलांतरीत करायचे का असा प्रश्न यावेळी उद्योजकांनी केला. दरम्यान उद्योजकांच्या समस्या ऐकून यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

वीज खंडीत झाल्यानंतर महावितरणला संपर्क साधल्यावर कर्मचारी वेळेवर हजर होत नाही. अनेकवेळा सुरक्षेची साधने त्यांच्याकडे नसतात. अनेकवेळा
वाहिन्या जळण्याचे प्रकारही घडतात. असा समस्यांचा पाढा यावेळी
उद्योजकांनी वाचला.

मागणी वाढल्याचा फटका

टीसाने आयोजित केलेल्या बैठकीला महावितरणचे भांडूप अर्बन झोनचे मुख्य अभियंता संजय पाटील उपस्थित होते. त्यांनी यावेळी व्यापार्‍यांशी संवाद साधला. औद्योगिक क्षेत्रामध्ये पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढली आहे. त्याचा भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत असल्याचे यावेळी स्पष्टीकरण देण्यात आले.