ठाणे जिल्ह्याच्या गरजांनुसार अभिनव योजना राबवणार

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचे प्रतिपादन

ठाणे: भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या गरजा ओळखून अभिनव उपक्रम आणि योजना राबवण्यात येतील, असे प्रतिपादन नवनियुक्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले.

गुरुवारी श्री.पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माहिती दिली.

ठाणे जिल्ह्यातील विविध भागात शासनाचे महत्वाकांशी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प राबवत असताना, जमीन हस्तांतरणाचा विषय महत्वाचा असून त्यावर देखील काम करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभाग त्याचबरोबर नागरी सुविधा यासाठी मागील अनुभवावरून काही उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी यावेळी सांगितले. ठाणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भाग असून काही त्यांचे प्रश्न आहेत, त्यानुसार नियोजन करणार आहे. शासनाने दिलेली ही माझ्यासाठी संधी आहे, अशा भावना श्री.पांचाळ यांनी व्यक्त केल्या.

शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवताना, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता देखील घेण्यात येणार आहे. पारदर्शक प्रशासन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जालन्यामध्ये मागील दोन वर्षे मी जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. तिथला अनुभव घेऊन येथील प्रशासन उत्तम पद्धतीने करेन, त्याचवेळी येथील लोकप्रतिनिधींच्या अपेक्षांची सांगड देखील येथील नियोजित योजना आणि विकासाशी घालण्यात येईल, असा विश्वास श्री.पांचाळ यांनी व्यक्त केला.

डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून ते लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण एमबीबीएस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई येथे झाले आहे. यवतमाळ येथील कार्यकाळात यवतमाळ जिल्हा परिषदेस यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. तसेच महिला बाल विकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. कोवीड काळात मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उप आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा केली. मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमामध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती. तसेच, जालना जिल्ह्यामध्ये रेशीम, कौशल्य विकास आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रांत भरीव काम केले आहे.