बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात सुमारे १० वर्षांपेक्षा जुना स्वयंचलित जिना बसवल्याने प्रवाशांत संतापाची लाट पसरली आहे. खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी याबाबतचा आक्षेप नोंदवल्यानंतर आज गुरूवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात जिन्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना जाब विचारला.
एमआरव्हीसीच्या कंत्राटदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केली. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वेतर्फे विविध सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेला होम फलाट रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक एक मध्ये बदलला. त्यानंतर जुना फलाट क्रमांक एकला दोन मध्ये रूपांतरीत करण्यात आले. त्यासाठी येथे जाळी लावण्यात आली. त्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. फलाट क्रमांक दोनवर अतिरिक्त सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली होती. त्यानंतर फलाट क्रमांक एकवर पादचारी पूल, छप्पर आणि स्वयंचलित जिन्याचे काम सुरू करण्यात आले.
फलाट क्रमांक एकवर सुमारे दहा वर्ष जुना स्वयंचलित जीना लावला जात असल्याची बाब महाविकास आघाडीने उघडकीस आणली आहे. भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर गुरूवारी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकात स्वयंचलीत जिन्याची पाहणी केली. या पाहणीत हा जिना जुना असल्याचे उघडकीस आल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी सांगितले.