मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर परिसरात नागरिकांचा संताप
ठाणे : घोडबंदर भागातील १०० टक्के झोपडपट्टी भाग असलेल्या मानपाडा, आझादनगर आणि मनोरमा नगर या परिसरातील नागरिकांकडून क्लस्टर योजनेला विरोध होत असून या परिसरातील नागरिक ठाणे महापालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात क्लस्टरच्या माध्यमातून विकास हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले होते. पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून या ठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी घरे मिळणार आहेत. परंतु या क्लस्टरच्या आराखड्यात नसलेल्या भागात देखील आता क्लस्टर योजना राबविण्याचा घाट घातला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
घोडबंदर भागातील मानपाडा, आझादनगर आणि मनोरमा नगरमधील जवळ-जवळ १०० टक्के भाग झोपडपट्टीने व्यापलेला आहे. या ठिकाणी रहिवाशांची छोटी घरे असल्याने तळ अधिक एक अशा पध्दतीने घरे वाढविली आहेत. परंतु आता कोणत्याही प्रकारची सुचना न देता महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी बायोमेट्रीक आणि जीआयएस सर्व्हे सुरु केला आहे. याची माहिती येथील रहिवाशांना मिळताच, त्यांनी या योजनेला तीव्र विरोध केला आहे.
मागील आठवड्यात या तीनही भागातील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन या विरोधात आवाज उठविला होता. त्यामुळे आता प्रशासनाला जाग येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुळात क्लस्टर ही योजना शहरातील अनाधिकृत धोकादायक इमारतींसाठी आणली गेली आहे. परंतु आता झोपडपट्टींचा भाग देखील त्यात घेतला जात आहे. त्यातही अशा धोकादायक इमारतींचा विकास करीत असतांना त्याच्या बाजूला असलेल्या एकूण झोपडपट्टीच्या २५ टक्के भाग क्लस्टरमध्ये घेता येऊ शकतो. मात्र ज्या ठिकाणी १०० टक्के झोपडपट्टी आहे, त्याठिकाणी क्लस्टर राबविता येऊ शकत नाही. असे नियमच सांगत आहे. त्यातही मानपाडा, आझादनगर, मनोरमा नगर आदी भागात अनधिकृत किंवा धोकादायक इमारती अंशत: सुध्दा नसताना या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून क्लस्टरचा घाट घातला जात असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.