आमदार प्रताप सरनाईक यांनी केली पाहणी
ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळमधील कावेसर भागात ४०० ते ५०० वृक्ष तोडण्यात आल्याच्या तक्रारी पुढे येत असून ही वृक्षतोड एका विकासकाने केल्याची चर्चा आहे. कत्तल झालेल्या वृक्षांमध्ये हेरिटेज वृक्षांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या परिसराची स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी करून कारवाईची मागणी केली आहे.
एकीकडे ठाणे शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जात असतानाच कावेसरमधील नेरोलॅक कंपनीच्या जागेवरील ४०० ते ५०० वृक्ष विनापरवाना तोडण्यात आल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या वृक्षतोडीमुळे येथील वनराई नष्ट झाली असून ही वृक्षतोड एका विकासकाने केल्याची चर्चा आहे. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी केली. वृक्ष प्राधिकरण विभागाच्या उपायुक्त मिताली संचेती, उद्यान निरिक्षक केदार पाटील, वृक्ष प्रधिकरण माजी सदस्य विक्रांत तावडे, संदिप डोंगरे, कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील हे यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी ४०० ते ५०० झाडांची कत्तल केल्याची आणि नेरोलॅक कंपनीच्या जागेवर बेकायदेशीररित्या बांधकाम सुरु असल्याची बाब पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
वाघबीळ ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात हेरिटेज असलेली वडाची आणि पिंपळाचे वृक्षही होते. तसेच या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्रजातीची झाडेही होती. या ठिकाणी ४०० ते ५०० झाडे असल्याचा पुरावा वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यानी गुगल मॅपच्या आधारे पोलिसांना सादर केला आहे. तसेच वृक्ष प्राधिकरण विभागानेही पोलीस ठाण्याला निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.