भाईंदर: मीरारोड येथील बागेश्वर धाम कार्यक्रमात जमलेल्या हजारोंच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची लूट करणाऱ्या सहा महिलांना मीरारोड पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयात हजर केले असता सदर महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
मीरारोड एस.के. स्टोन परिसरातील १८ व १९ रोजी बागेश्वर धामच्या धीरेंद्र महाराजांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने भाविक जमले होते. जमलेल्या गर्दीचा फायदा उठवून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. सदर प्रकरणी दोन चोरट्या महिलांना उपस्थित भाविकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले.
त्यांची कसून चौकशी करताच आणखी चार जणी पोलिसांच्या हाती लागल्या. या सर्वजणी राजस्थान मधील अलवर या गावच्या असून सदर महिलांना ठाणे न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.