* पेहलगाम हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेवर परिणाम
* रद्द आरक्षणामुळे हॉटेल, टुरिस्ट व्यवसायाला फटका
ठाणे: जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सिव्हिल रुग्णालयात यात्रेसाठी आवश्यक फिटनेस प्रमाणपत्रासाठी शुक्रवारी फक्त एकाच व्यक्तीचा अर्ज आला.
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीजवळ झालेल्या या भीषण हल्ल्यात २७ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर १६ जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी एकाचवेळी गोळीबार करत या पर्यटकांना लक्ष्य केले. या क्रूर घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. याचा धसका पर्यटकांनी घेतला आहे.
जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेकरिता जाण्यासाठी आत्तापासूनच भाविक जाण्याची तयारी करतात. यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र सिव्हिल रुग्णालयात प्रमाणपत्र घेणाऱ्या यात्रेकरूंची संख्या रोडावली आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात ८ एप्रिलपासून अमरनाथ यात्रेकरिता जाण्यासाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे. पहिल्याच दिवशी साधारण ७५ भाविकांचे प्रमाणपत्रासाठी अर्ज आले होते. मात्र हल्ल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी संख्या घटली आहे. शुक्रवारी तर केवळ एकाच व्यक्तीचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज आला होता. शासनाने भाविकांच्या सोयीसाठी मुंबईतील सर्व महापालिका रुग्णालय, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका रुग्णालय, सिव्हिल रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात यावर्षी आत्तापर्यंत ३०५ वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रासाठी अर्ज आले. यामध्ये २२४ पुरुष तर ८१ महिलांचा समावेश आहे. तर गेल्यावर्षी ११५६ अर्ज प्राप्त झाले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होतात. यंदा सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र, हल्ल्यानंतर यात्रांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक भाविकांनी प्रवासाची योजना रद्द केली आहे. पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसत असून, हॉटेल्स आणि प्रवासी कंपन्यांना अचानक रद्द झालेल्या आरक्षणाचा फटका बसत आहे.