कुंटे दाम्पत्याचा ज्ञानाचा खजिना प्रदर्शनात
ठाणे : काही दगडांमधून नाद ऐकू येतो तर काही दगड पाण्यावर तरंगतात. यामागील विज्ञान समजून सांगणारे प्रदर्शन लुईसवाडी येथील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत सुरू आहे. कुंटे दांपत्याने भारतातील प्राचीन मंदिरांचा आणि दगडांचा अभ्यास करून ज्ञानाचा खजिना ठाणेकरांसाठी खुला केला आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये मंदिरांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. किंबहुना विविध राज्यांतील, गावांतील मंदिरांभोवती आपल्या सर्व परंपरा आणि ग्रामव्यवस्था जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात प्राचीन काळापासून मंदिर कला ही विकसित झाली आहे. मात्र केवळ देवदर्शन हा हेतू न ठेवता यात्रा करताना त्या मंदिरांमागील स्थापनेचा विचार, स्थापत्यशास्त्र, त्यामागील विज्ञान व परंपरा यांची ओळख करुन देण्याचा ‘अश्वमेध’ कुंटे दांपत्याने सुरू केला आहे.
एका ध्येयाने प्रेरित होऊन पुणे येथील मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंटे यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारून 1991 ते 2007 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जवळपास 17 हजारांहून अधिक मंदिरांना प्रत्यक्ष भेट दिली व त्याची छायाचित्रे, माहिती संकलन, आठवणी असा ज्ञानाचा एक खजिना विकसित केला व तो जपला. मोरेश्वर कुंटे यांचे चिरंजीव प्रभाकर कुंटे आपल्या पालकांचे हे अफाट कार्य पुढे चालवत आहेत.
अशा सर्व दुर्मिळ फोटोंचे व ऐतिहासिक दगडांचे प्रदर्शन हाजुरी, लुईसवाडी येथील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत गेले दोन दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात भरविण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी दोन दिवसांत 700 ते 800 हून अनेकांनी गर्दी केलीच शिवाय ‘गाणारे दगड, बोलणारे पाषाण’ याबद्दल माहिती घेतली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ठाण्यातील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे संस्थापक डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब ऑफ ठाणें नॉर्थ एंडचे अध्यक्ष संदीप पहारिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कार्यासाठी उत्स्फूर्त देणगी दिली. ठाण्यातील सर्वांना सुपरिचित ज्येष्ठ सनदी लेखापाल संजीव ब्रह्मे आणि ज्येष्ठ विधीज्ञ राजेश मुधोळकर यांनी हे प्रदर्शन ठाण्यात घडवून आणण्यात विशेष पुढाकार घेतला.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते काही विशिष्ट प्रकारचे दगड पाण्यात सोडण्यात आले. ते तरंगताना प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही दगडांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त (कॉम्पेक्ट) असल्यास त्यातून नाद निर्माण होतो. शिरूर येथे असलेल्या नंदीमध्ये लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यातून नाद ऐकू येतो, अशी माहिती प्रभाकर मोरेश्वर कुंटे यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
यामागील विज्ञान जाणून घ्यावे व एकूणच प्रदर्शनाचा प्रत्यक्ष येऊन लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभाकर कुंटे यांनी समस्त ठाणेकरांना केले.
मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यांतील 15 हजारहून अधिक मंदिरांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या बजाज एम 50 वर एक लाख किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे आणि 18 हजारहून अधिक छायाचित्रे घेतली आहेत.
मंदिरांची माहिती गोळा करणे सोपे काम नाही, असे श्री.कुंटे म्हणाले. मंदिराची चिन्हे अनेकदा तुटलेली किंवा खराब होतात, तर काही मंदिरांमध्ये चिन्हे नसतात आणि माहितीसाठी वृद्ध ग्रामस्थ आणि स्थानिक सरकारी अधिकारी यांच्यावर अवलंबून राहावे लागते.
कुंटे दांपत्यांची महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील मंदिरांवर सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मंदिरांचा एक विश्वकोश प्रकाशित करण्याची त्यांची योजना आहे जो अशा प्रकारचा पहिला असेल, असे त्यांनी सांगितले.