होर्डींग्जमध्ये मापात पाप; ठामपा करणार कारवाई

ठाणे: ठाण्यात ९० पेक्षा अधिक होर्डिंग हे दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केल्यानंतर येत्या आठ दिवसांत हे सर्व ओव्हरसाईज होर्डिंग नियमात न आणल्यास अशा सर्व होर्डिंगवर कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने बुधवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीमध्ये दिला आहे.

मुंबईत होर्डींग्ज पडून झालेल्या दुर्घटनेनंतर आता ठाणे महापालिकेला जाग आली आहे. त्यानुसार ठाण्यात अशा प्रकारची हानी होऊ नये या दृष्टीने बुधवारी महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील जाहीरातदारांची (होर्डींग्ज) बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुढील आठ दिवसांत स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. तसेच होर्डींग्जबाबत जी नियमावली ठरवून देण्यात आली आहे, त्याचे पालन करण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३०० च्या आसपास होर्डींग्ज आहेत. परंतु ९० ठिकाणी दिलेल्या परवानगीपेक्षा अधिकच्या आकाराचे म्हणजेच ओव्हरसाईज होर्डींग्ज उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या ज्या जाहीरातदारांनी ओव्हरसाईज होर्डींग्ज उभारले आहेत, त्यांनी ते आठ दिवसांच्या आत नियमात आणावे अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यापूर्वी देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. परंतु आता पुन्हा पुढील आठ दिवसात ऑडिट अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय जाहीरात धोरणातील नियमांचे पालन करावे, अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने २००३ च्या शासन जाहिरात धोरणानुसार जाहिरातफलक उभारणीस परवानगी देण्यात येते. यापुढे जाहिरातफलक लावण्यासाठी परवानगी देताना शहराच्या सौंदर्यास बाधा येणार नाही अशा पद्धतीने परवानगी देणे, किती क्षेत्रफळामध्ये आणि किती आकाराचे होर्डींग उभा करता येईल, किती अंतरावर परवानगी देता येईल याबरोबरच न्यायालयाच्या निदेर्शांचे पालन करणे, नागरिकांच्या दृष्टीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात आले आहे.

पालिका प्रशासनाच्या नियमावलीनुसार २० फुटापर्यंत होर्डींग्ज असावे, रस्त्याच्या अथवा फुटपाथच्या कडेला रस्त्यावर होर्डींग्ज असू नये, कोणते रंग असावेत, कोणते असू नयेत, अश्लील मजकुर प्रसिध्द होऊ नये, फुटपाथपासून चार फुट आतमध्ये होर्डींग्ज असावे, नागरीकांच्या तक्रारी असल्यास त्या ठिकाणी होर्डींग्ज उभारण्यात येऊच नयेत तसेच दोन होर्डींग्जमध्ये किती अंतर असावे याची माहिती सुध्दा पालिकेने दिलेली आहे. अशी १८ नियमांची ही नियमावली आहे.

महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तत्काळ सर्वेक्षण करण्याचेही निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत. शहरात एकही धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग नाहीत असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला होता. मात्र आता पालिकेच्या अधिकाऱ्यांनीच तत्काळ सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.