वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेचा कृती आराखडा
ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेच्या वतीने कृती आराखडा तयार केला असून शहरातील सिग्नल चौकांची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक देखील घेण्यात आली असून वाहतूक कोंडीच्या कारणांचा देखील आढावा घेण्यात आला असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार संभाळल्यानंतर सौरभ राव यांनी सोमवारी पहिलाच पाहणी दौरा केला असून हा पहिलाच पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यामध्ये क्लस्टर योजनेचा आढावा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, स्मशान भूमी, रायलादेवी तलाव तसेच महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेचा देखील आढावा घेतला. महापालिकेत सुरु असलेली विकासकामे ही दर्जात्मक होत असून या विकास कामांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने एक एक्शन प्लॅन तयार केला असून यामध्ये शहरातील सिग्नल, चौकांचे रीडीजाइनिंग तसेच रीइंजिनियरिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक देखील झाली असून या बैठकीमध्ये वाहतूक कोंडीवर अभ्यास देखील करण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान महापालिका आयुक्त यांच्या पाहणी दौऱ्यात पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांना शहरातील केवळ चकाचक वास्तू दाखवण्यात आल्या असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक, वागळे येथे अद्यावत बांधण्यात आलेली स्मशान भूमी तसेच वागळे पट्ट्यातीलच स्वच्छ शौचालय दाखवण्यात आले. याशिवाय आयुक्तांचा दौरा ज्या ज्या ठिकाणी होता या ठिकाणी आधीच रस्ते सफाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयुक्त प्रत्यक्ष जागेवर पोहचण्याचा आधीच सफाई कर्मचारी रस्त्यांची सफाई करताना दिसले.