ठाणे, भिवंडी, कल्याणमधील प्रवाशांची कोंडीतून होणार सुटका
ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गवरील वाढत्या वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी खारीगाव खाडीवर उभारण्यात आलेल्या ८२५ मीटर लांबीचा उड्डाणपूल बुधवार २९ एप्रिलपासून जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे ठाणेहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनचालकांना विशेषतः ठाणे, भिवंडी आणि कल्याणमधील प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या पूलाचे लोकार्पण करण्यात आले. बुधवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास नव्या पूलावरून मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा येथून भिवंडी, कल्याण, नाशिकच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने सोडली गेली. तर जुन्या पूलावरून भिवंडी, कल्याण, नाशिकच्या दिशेने वाहने सोडण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणी झाल्यानंतर भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून रस्त्याचे रुंदीकरण तसेच पर्यायी उड्डाण पुलांची उभारणी करण्यात येत आहे. खारीगाव टोलनाक्याजवळील जुन्या साकेत पुलाच्या शेजारी नवीन उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. पूर्वी केवळ १५ मिनिटांत पार होणारा हा टप्पा पार करण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे एक तास लागत होता. साकेत उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात कोंडी कमी झाली होती; मात्र पुढील अरुंद रस्त्यामुळे चार मार्गिकांची वाहतूक दोन मार्गिकांवर येत असल्याने वाहनांचा वेग पुन्हा मंदावत होता. आता खारीगाव खाडीवरील नवीन उड्डाणपूल सुरू झाल्याने या समस्येत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अशातच पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली लोड टेस्टिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजिवडा-वडपे या प्रकल्पाची मुख्य मार्गिका २३.८० किमी लांबीचा असून २१.३१ किमी लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. त्यानुसार हा प्रकल्प ९० टक्के पूर्ण झाला आहे. तर सेवा रस्ते १८.३५ किमी लांबीचे असून त्यापैकी १६.८८ किमी लांबीची कामे पूर्ण झाली. हा प्रकल्प मे महिन्याच्या अखेरीस म्हणजेच, पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन ‘एमएसआरडीसी’चे आहे.
याबाबत एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांनी विचारले असता, बुधवार, २९ एप्रिलपासून हा उड्डाण पूल अधिकृतपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ठाणे-नाशिक मार्गावरील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.