कल्याण स्थानकात आरपीएफ जवानाची सतर्कता
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. २८ एप्रिल रोजी सायंकाळी धावत्या ट्रेनमधून उतरताना घसरलेल्या महिला आणि तिच्या एक वर्षीय बाळाला आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी तत्काळ धाव घेत सुरक्षित वाचवले.
अंतिमा शुक्ला ही महिला तिचा एक वर्षाचा मुलगा सर्वज्ञ शुक्ला याच्यासह प्रयागराज ते मुंबई असा प्रवास करत होती. ट्रेन कल्याण स्थानकात येत असताना उतरण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि ती बाळासह प्लॅटफॉर्म व रेल्वेगाडीच्या मधील जागेत घसरली. मात्र, तेथे ड्युटीवर असलेल्या एएसआय हेमंत भरगुडे यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेत दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.