मुंबई : विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली असताना, काँग्रेसने दानवेना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला आहे. या निवडणुकीत आता काँग्रेसही आपला उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषद लढवावी अशी आग्रही भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी तसे स्पष्ट केले होते. ठाकरे उमेदवार असल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वतः ही निवडणूक न लढता अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
याआधी शरद पवार यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता. बारामती पोटनिवडणूक न लढता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर काँग्रेसकडूनही या ठिकाणी निवडणूक न लढण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र या मुद्द्यावरून एकत्र राहिलेले महाविकास आघाडीतील घटकपक्ष अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून आमने सामने उभे ठाकणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज न भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांना काँग्रेसची मनधरणी करावी लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) नेमकी काय भूमिका जाहीर करते हेही महत्त्वाचे ठरणार आहे.