प्रो कबड्डी लीग (पीकेएल) च्या १० व्या आवृत्तीने दणदणीत हजेरी लावली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, या शानदार स्पर्धेने अनेक रोमांचक सामने आणि तितक्याच मोठ्या संख्येने उत्कृष्ट खेळाडू तयार केले आहेत, ज्यापैकी काहींनी भारतीय संघात स्थानसुद्धा मिळवले आहे.
“स्पोर्ट्स कट्टा” च्या अलीकडील एपिसोडमध्ये, अमोल गोखले यांनी अशा दोन खेळाडूंशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. शुभम शिंदे आणि आदित्य शिंदे या सख्ख्या भावांच्या जोडीने कबड्डी क्षेत्रात केलेली कामगिरी आणि त्यांचा मातीपासून मॅटपर्यंत झालेला प्रवास अशा अनेक गोष्टी या गप्पांमधून गोखले यांनी उलगडल्या आहेत. सध्या शिंदे बंधू बंगाल वॉरिअर्ससाठी पीकेएलमध्ये खेळतात. शुभम सहाव्या सीझनपासून (२०१८) पीकेएल खेळत आहे तर आदित्यने २०२३ मध्ये या स्पर्धेत पदार्पण केले आहे. शुभमची सुरुवात पुणेरी पलटणकडून खेळण्यापासून झाली (२०१८-१९). नंतर पटणा पायरेट्सने त्याची निवड केली (२०२१) आणि आता तो बंगाल वॉरियर्सचा २०२२ पासून एक अविभाज्य भाग आहे.
सहसा आपण ऐकतो की धाकटा भाऊ किंवा बहीण आपल्या मोठ्या भावंडांकडून प्रेरणा घेतात. पण शुभम आणि आदित्य यांची कहाणी जाणता त्यांच्याबाबतीत काहीसे वेगळे आहे. मोठा भाऊ शुभम याने आपल्या छोटा भाऊ आदित्यपासून कबड्डी खेळायची प्रेरणा घेतली.
शुभम सांगतो, “मी आदित्यला लहानपणापासून कबड्डी खेळताना पाहिलं. मी त्याच्यासोबत मैदानावर जायचो आणि हळूहळू खेळात रस निर्माण झाला. मी ११वीत (१६ वर्षांचा) असताना खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला मी ज्युनियर, सब-ज्युनियर आणि सीनियर स्तरावर खेळलो. नंतर मी सेंट्रल बँक आणि एअर इंडियासाठी व्यावसायिक कबड्डी खेळलो. तिथून माझी युवा पलटणकडून खेळण्यासाठी निवड झाली. युवा पलटणसाठी दोन वर्षे खेळल्यानंतर, २०१८ मध्ये (पीकेएल ६) पुणेरी पलटणसाठी माझी निवड झाली.”
शुभमने आदित्यकडून प्रेरणा घेतली होती, परंतु आदित्यला कोणामुळे कबड्डीची आवड निर्माण झाली? आदित्य या प्रश्नाचे उत्तर देत म्हणतो, “माझी चुलत भावंडं कबड्डी खेळायचे. त्यांच्या क्लबचे सामने पाहण्यासाठी मी माझ्या वडिलांसोबत जायचो. हळूहळू मी खेळाच्या प्रेमात पडायला लागलो आणि १२-१३ वर्षांचा असताना मी कबड्डी खेळायला सुरुवात केली.”
त्याच्या कबड्डीची सुरुवात रत्नागिरीपासून झाली. क्लब सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करत त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. नंतर व्यावसायिक कबड्डी एअर इंडिया कडून खेळली आणि आता जगातील दर्जेदार कबड्डी लीग, अर्थातच पीकेएलचा तो भाग आहे.
आपल्या प्रवासाकडे मागे वळून पाहताना आदित्य सांगतो, “जेव्हा मी पीकेएलचा पहिला सीझन टेलिव्हिजनवर पाहिला तेव्हा या लीगमध्ये खेळण्याचे माझे ध्येय होते. पीकेएलच्या स्थापनेपूर्वी कबड्डी एवढा काही प्रसिद्ध खेळ नव्हता. पण आज संपूर्ण जगाला या खेळाबद्दल आणि खेळाडूंबद्दल माहिती आहे. याशिवाय, कबड्डीपटू आता या खेळात करिअर करायचा विचार करू शकतात.”
शुभम आपल्या प्रवासाबद्दल सांगतो, “हा एक अविश्वसनीय प्रवास होता. जेव्हा माझी पहिल्यांदा पीकेएलसाठी निवड झाली तेव्हा मी पुणेरी पलटण संघातील महाराष्ट्राच्या सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक होतो. त्यानंतर, मी पटणा पायरेट्समध्ये गेलो. तीन वेळा चॅम्पियन असलेल्या संघाचा भाग असणे खरोखरच सन्मानाची गोष्ट होती. तथापि, चॅम्पियन संघाचा भाग असणे कधीही सोपे नसते. सीझन ८ मध्ये मी बरेच चढ-उतार अनुभवले. मी संघाच्या आत-बाहेर असायचो.”
२०२२ पासून शुभम बंगाल वॉरियर्ससोबत आहे ज्यात त्याचा आवडता कबड्डीपटू मनिंदर सिंग सुद्धा आहे. “पीकेएल ७ सिझन जिंकणारा संघ बंगाल वॉरियर्स या संघाकडून खेळताना मी बिंदास असतो. संघात महाराष्ट्राचे खेळाडू असल्यामुळे बंगाल वॉरियर्सची संघ रचना आणि मानसिकता बरीच पुणेरी पलटणसारखी आहे,” असे शुभम सांगतो.
शिंदे बंधू, ज्यांनी क्लब स्तरावर कबड्डी खेळ खेळला आहे. क्लब, जिल्हा इत्यादींसाठी बरेच सामने खेळणे आणि त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे यावर ते भर देतात. तुमचे चांगले प्रदर्शन जेव्हा तुमच्या प्रशिक्षकांच्या आणि पीकेएलशी संबंधित असलेल्यांच्या लक्षात येते तेव्हा तुमची या लीगमध्ये निवड होण्याची शक्यता वाढते. याशिवाय, एकदा तुमची पीकेएलमध्ये निवड झाली की तुम्ही तुमचा खेळ, फिटनेस, डायट, इत्यादी हलक्यात घेऊ शकत नाही. तुम्हाला तीन महिन्यात २२ सामने खेळायचे असतात म्हणून तंदुरुस्त राहणे अत्यंत महत्वाचे असते.
शुभम आणि आदित्य यांची कामगिरी केवळ रत्नागिरीतच नाही तर संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनली आहे. लहानपणापासून एकत्र राहिल्यामुळे, या जबरदस्त जोडीतील बंध आणखी घट्ट झाले आहेत, जे ते मॅटवर ज्या पद्धतीने खेळतात त्यावरून स्पष्ट होते. शुभम आणि आदित्य बंगाल वॉरियर्ससाठी अनुक्रमे उजवा आणि डावा कॉर्नर सांभाळतात.
त्यांच्या यशाचे रहस्य सांगताना आदित्य म्हणतो, “आमचे बाँडिंग आणि समन्वय आम्हाला चांगली कामगिरी करण्यास मदत करते. सामन्याच्या वेळेला आम्ही आमच्या नजरेतून आणि देहबोलीद्वारे संवाद साधतो. त्याला (शुभम) कळते की मी केव्हा अँकल होल्ड किंवा थाय होल्ड करणार आहे आणि त्याचप्रमाणे तो कधी हल्ला करणार आहे हे मला समजते.”
शुभम आदित्यशी सहमती दाखवत सांगतो, “आम्ही नेहमी त्याच पोझिशनमध्ये (उजवा आणि डावा कॉर्नर) खेळत आलो आहोत मग ते क्लबसाठी असो किंवा एअर इंडियासाठी किंवा नंतर युवा पलटणसाठी आणि आता बंगाल वॉररिअर्ससाठी. आम्हाला सरावापेक्षा आमचे मजबूत बंध चांगले प्रदर्शन करण्यास मदत करते.”
बंगाल वॉरियर्सच्या डिफेन्सचा पाया हे दोन बंधू आहेत. त्यांच्यासाठी, वैयक्तिक खेळापेक्षा त्यांच्या संघाचे यश महत्त्वाचे आहे. पीकेएल १० मध्ये चॅम्पियन बनण्याचे त्यांचे लक्ष आहे.
शिंदे बंधू महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळकेवाडी नावाच्या छोट्या गावातील रहिवासी असून त्यांनी त्यांची छाप संपूर्ण भारतावर सोडली आहे. त्याचबरोबर त्यांनी तरुणांना “महाराष्ट्राची पंढरी” आणि “आपली माती आपला खेळ” म्हणून ओळखली जाणारी ही कबड्डी यात करिअर करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.
आदित्य म्हणतो, “कबड्डीमध्ये ऑलिम्पिक खेळ होण्याची क्षमता आहे. मातीपासून मॅटपर्यंतचा हा कबड्डीचा प्रवास लक्षणीय आहे. खेळ अधिक जलद आणि रोमांचक झाला आहे. भारतात एकदा हा खेळ लोकप्रिय झाला की, संपूर्ण जग या खेळाची दखल घेईल.”
रॅपिड फायर
1. आदित्यबद्दल तुला आवडणारी एक गोष्ट कोणती आहे?
शुभम: जिम (त्याच्या फिटनेससाठी तो ज्या पद्धतीने सराव करतो)
२. शुभमबद्दल तुला आवडणारी एक गोष्ट कोणती आहे?
आदित्य: खेळाची शैली (स्टाईल)
3. कबड्डी व्यतिरिक्त तुम्हाला कोणता खेळ आवडतो?
शुभम: क्रिकेट
आदित्य: फक्त कबड्डी
4. तुमचा आवडता कबड्डी खेळाडू कोणता?
शुभम: मनिंदर सिंग
आदित्य: निलेश शिंदे
5. कबड्डीपटू झाले नसता तर कशामध्ये करिअर केले असते?
शुभम: मी नोकरी केली असती.
आदित्य: सी.ए.
6. पीकेएल मधील तुमचा आवडता संघ कोणता आहे?
शुभम आणि आदित्य: बंगाल वॉरियर्स
7. जीवनात तुमचे ध्येय काय आहे?
शुभम: आशियाई गेम्स आणि विश्वचषक खेळणे
आदित्य: भारतासाठी खेळणे
8. कबड्डीच्या बाहेर तुम्हाला कोणता खेळाडू आवडतो आणि का?
शुभम: रोनाल्डो, मला त्याचा फिटनेस, मानसिकता, फोकस आणि त्याचा शिस्तबद्ध डाएट आवडतो
आदित्य: विराट कोहली. तो त्याचा दिवस ज्या प्रकारे शेड्यूल करतो ते मला आवडते. तो त्याची झोप, आहार, व्यायामशाळा इत्यादींच्या संदर्भात एक निश्चित दिनचर्या पाळतो. तो सामना खेळत असला किंवा नसला, तो व्यायामशाळेत व्यायाम करतो. ३५ वर्षांचा असूनही त्याचा फिटनेस १९-२० वर्षांच्या मुलासारखा आहे.
Watch the full interview here: https://www.youtube.com/watch?v=lP_CtoaAH6g