श्रीकांत वाड भा. रा. बॅडमिंटन संघटनेच्या डेव्हलपमेंट कमिटीवर

ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व ठाण्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या व देशातही बॅडमिंटन क्षेत्रात अनेक वर्षे विविधांगाने कार्यरत असणारे श्रीकांत वाड यांची बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय विकास समितीवर नियुक्ती केली आहे. १५ मे २०२२ रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय पुरूष बॅडमिंटन संघाने नुकत्याच मिळवलेल्या ऐतिहासिक थॉमस कप विजयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघटनेने हा निर्णय घेतला आहे. खेळाच्या सर्वांगीण व सर्वदूर विकास करण्यासाठी व नवनव्या डेव्हलपमेंट योजना तयार करणे, त्यांचे नियोजन करणे व त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. हेमंत शर्मा तसेच खजिनदार अरुण लखानी यांनी सांगितले. विख्यात खेळाडू व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद हे ह्या विशेष समितीचे अध्यक्ष असून श्रीकांत वाड यांचेखेरीज पश्चिम बंगालचे शेखर विश्वास, ओरिसाचे श्री. पुजारी, चंदीगडचे सुरींदर महाजन, छत्तीसगढचे संजय भन्साली तसेच मध्यप्रदेशचे अनिल चौगुले यांचेसह अनेक ज्येष्ठ व बॅडमिंटन क्षेत्रातले जाणकार या समितीचे सदस्य आहेत.

या समितीच्या माध्यमातून बॅडमिंटनच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नवे उपक्रम राबवता येतील व देशातील उगवत्या खेळाडूंना याचा मोठाच फायदा होईल तसेच विशेषतः महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या विकासाच्या, प्रशिक्षणाच्या नवनीत योजना अंमलात आणता येतील असा विश्वास या प्रसंगी श्रीकांत वाड यांनी प्रकट केला.

ठाण्याच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेची १९८८ साली मुहूर्तमेढ रोवून आजतागायत हजारो खेळाडू तयार करणारे श्रीकांत वाड हे त्या योजनेचे योजनाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. २००६-२००९ या कालावधीत त्यांनी आशियाई बॅडमिंटन संघटनेचे डेव्हलपमेंट ऑफिसर (विकास अधिकारी) म्हणून काम पाहिले असल्याने त्यांना
डेव्हलपमेंट क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. याखेरीज जगातील बॅडमिंटन विकसनशील अशा सुमारे १५ देशांमध्ये तिथल्या प्रशिक्षकांना प्रशिक्षणाचे धडे श्री. वाड यांनी दिले आहेत.

या खेरीज श्री. वाड यांना महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठापूर्ण २००३-२००४ सालचा दादोजी कोंडदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी आजवर ६ राष्ट्रीय, २६ राज्य अजिंक्यपद व ३० जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन केले आहे. शिवाय सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी व अन्य अनेक पदांच्या जबाबदाऱ्या त्यांनी गेली २५ वर्षे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन साठी सांभाळल्या आहेत.

श्रीकांत वाड यांच्या या प्रतिष्ठापूर्ण नियुक्तीमुळे ठाण्याच्या व महाराष्ट्राच्या बॅडमिंटनला मोठाच फायदा होईल अशी प्रतिक्रिया ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. श्री. वाड यांनी या संधीचे आपण सोने करून दाखवू व बॅडमिंटनच्या प्रचारासाठी व विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे बोलून दाखवले व ही संधी दिल्याबद्दल व हा विश्वास टाकल्याबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांचे आभार मानले आहेत.