खुल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा
कल्याण : कल्याण येथे नुकत्याच पार पडलेल्या रोटरॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आयोजित खुल्या बॅडमिंटन राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सुमारे 300 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सहा विविध गटांमध्ये ठेवण्यात आलेल्या स्पर्धेत ठाणे महापालिकेच्या बॅडमिंटन अकॅडमीच्या उभरत्या खेळाडूंनी उत्तम खेळाचे सादरीकरण करीत नऊ पदकांची लयलूट केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेत म्हणजेच ठाणे बॅडमिंटन अकॅडमीमध्ये गेली पाच वर्षे बॅडमिंटनचे धडे गिरवणाऱ्या श्वेतांक कर्णिक या गुणी खेळाडूने पुरुष एकेरीत सुवर्णपदक तर मिश्र आणि पुरुष दुहेरीमध्ये कांस्यपदक पटकावण्याची किमया केली आहे.
श्वेतांक कर्णिक याने पुरुष एकेरी उपांत्य फेरीच्या लढतीत बिपिन जॉन्सन या खेळाडूचा 21-16, 21-10 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीच्या लढतीत सारंग हिरेकर याचा 21-9, 21-18 अशा एक हाती विजय प्राप्त करीत एकेरीचे सुवर्णपदक पटकावले. श्वेतांकने मिश्र दुहेरीमध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमी च्याच मनस्वी वैद्य हिला जोडीला घेऊन कांस्यपदक पटकावले तसेच त्याने पुरुष दुहेरीत देखील कांस्यपदक पटकावले आहे. याच गटात ठाण्याच्या नंदिनी पांड्या या उभरत्या खेळाडूने देखील कांस्यपदक पटकावले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या यश ढेंबरे याने 17 वर्षाखालील मुलांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीच्या लढतीत ईशान साळवी याचा पराभव करीत त्याने पुन्हा एकदा सुवर्णपदकाला गवसणी घातली तर याच गटात ठाणे बॅडमिंटन अकॅडमी तनय जोशी यांनी कांस्यपदक पटकावले आहे. पुरुष दुहेरीच्या अटीतटीच्या सामन्यात अंतिम फेरीत ठाणेकर खेळाडू तनय जोशी आणि यश ढेंबरे यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे योजना प्रमुख श्रीकांत वाड यांनी या यशाबद्दल दीर्घ समाधान व्यक्त केले आहे. या विजयासाठी ज्येष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर व अक्षय देवलकर, मितेश हाजरनीस, बिषाल दास त्याचप्रमाणे विघ्नेश देवळेकर, कबीर कंझारकर तसेच क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी या खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांचेही कौतुक करीत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.