सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?

मुख्यमंत्री शिंदेची घणाघाती टीका 

जळगाव : ‘गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकऱ्याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना चालत नाही. मात्र जनेतेने आम्हाला स्वीकारल आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का?’ असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जळगावात राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर असून आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा झाली. यासभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षावर प्रहार केला. यावेळी ते म्हणाले कि, शिवसेनेत असताना आम्ही उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी पक्ष संपवीत आहे, हे वारंवार सांगत होतो. त्यावेळी गुलाबराव पाटील देखील म्हणत होते, त्यांना सांगा राष्ट्रवादी आपल्याला संपवत आहे. मी स्वतः त्यांना पाच वेळा सांगितले, कि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेलो ती चूक सुधारा, पण ऐकले नाही.

ते पुढे म्हणाले, कि आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि मोदीचा फोटो लावला आणि निवडणूक जिंकलो. शिवसेनेतून बाहेर पडत आम्ही बरोबर केले. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? आम्ही चूक सुधरवली मग गद्दार कोण? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला. आमदार खासदार यांची कामे होत नव्हती, आता ती दोन महिन्यात केली. विरोधी पक्ष आता घाबरला असून एकनाथ शिंदे गणपती मंडळ फिरतो, घराघरात जातो. त्यामुळे ते फिरत आहेत. आता त्यांनी अर्धे पुण्य मला द्यायला हवे. तर काहीजण दोन मुख्यमंत्री ठेवण्याचे सांगतात.मात्र त्यांना आधीचा अनुभव असल्याने ते असे म्हणत असल्याचा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना लगावला.

सोन्याचा चमचा घेऊन आलेले….
जळगावात गुलाबराव पाटलांचे प्रस्थ आहे. मात्र गुलाबराव पाटलांना हिणवले जाते. कुणीही हिणवण्याचे काम करू नये. मी स्वत शेतकऱ्याचा मुलगा आहे, मात्र मुख्यमंत्री झाल्यावर ते चालत नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. शहाजी बापू स्टेजवर आल्यावर लोकांच्या टाळ्या वाजल्या. मुख्यमंत्र्यांनी शहाजी बापूचा फेमस डायलॉग म्हटला. दोन वर्षात आम्ही एवढं काम करू की औषधाला सुद्धा कोणी शिल्लक नाही राहणार. फक्त गोमुत्र शिंपडणारे तेवढे शिल्लक राहतील? असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

200 चा आकडा गाठणार
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांना सांगायचे आहे, आम्ही निवडणूक बघून काम करत नाही. गुलाबराव पाटील यांनी 22 हजार पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेतोय. हैदराबादला गेलो होतो, त्यावेळी तिथले नागरिक आमच्यासोबत लोक फोटो काढत होते. गर्दी झाल्याने पोलिसांना आवरणे कठीण झाले होते. आज आम्ही 170 आहोत. आता फक्त 30 चा आकडा वाढवायचा आहे, त्यामुळे 200 च्या पुढे गेलो तरी आश्चर्य वाटायला नको, हे ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध होते असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.