शिवजयंती तिथीनुसारच; ठाण्यात मनसेचे भव्य आयोजन

ठाणे: सर्व सण तिथीनुसार साजरे करतो तेव्हा, शिवजयंती उत्सवही तिथीनुसारच जल्लोषात साजरा करण्याचे निर्देश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत दिले होते. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिलेदार जोमाने कामाला लागले आहेत.

त्यानुसार सोमवारी २१ मार्च रोजी छत्रपती शिवरांयांच्या जयंतीप्रित्यर्थ मनसेने विविध कार्यक्रमांचे आयोजन ठाण्यात केले आहे. मनसेच्यावतीने ठाण्यातील प्रत्येक प्रभागात भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बाबत अनेक जण टिप्पणी करत असतात, याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत राज्यपालांना खडे बोल सुनावत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ३६५ दिवस साजरी करा, असा संदेश दिला. दिवाळी, गणपती, नवरात्र सर्व सण तिथीनुसारच करतो. छत्रपतींची जयंती, तर एक सण आहे. माझ्या राजांचा जन्मदिवस हा मराठी माणसाचा सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार, ठाण्यात मनसेच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील प्रत्येक प्रभागात शिवजयंती साजरी करण्याचे नियोजन मनसे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर प्रमुख रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. मनसेच्या प्रत्येक शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होणार असून विविध प्रकारची प्रदर्शनेही भरवण्यात येणार आहेत. तर काही ठिकाणी दुचाकी रॅली, ढोलताशांचा गजर घुमणार आहे. सायंकाळी नौपाड्यातील मनसेच्या मध्यवर्ती शाखेपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार असून मुंबईतील प्रसिद्ध बँड, लेझीम, दांडपट्टा, घोडे, रथ तसेच पारंपरिक वेशभूषेत मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.