पोलीस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षीत वाघनखं अखेर महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत.

या ऐतिहासिक वाघनखांचे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत स्वागत करण्यात आले. त्यानंतर, स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यात ही वाघनखं पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली. साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते १९ जुलैला साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यात या वाघनखांच्या स्वागताला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहतील. १९ जुलैला ढोल-ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात वाघनखं आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर सर्व सातारकरांना ही वाघनखं पाहाता येणार आहेत.

दरम्यान, लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही वाघनखं राज्यातील चार संग्रहालयांमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहे.

वाघनखं भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे, त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. तसेच, वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले होते.