महाशिवरात्रीला अंबरनाथचे शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच रहाणार 

अंबरनाथ – कोरोना आणि ओमिक्रॉनच्या निर्बंधांमुळे उद्या महाशिवरात्रीला अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी मागील वर्षाप्रमाणे सलग दुसऱ्या वर्षीही बंद ठेवण्यात येणार आहे.    उद्या मंगळवारी महाशिवरात्र असून अंबरनाथला महाशिवरात्रीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. मात्र कोविड आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार महाशिवरात्रीनिमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आल्याचे अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यात्रा रद्द करण्यात आल्याचे फलक मंदिराबाहेर आणि परिसरात अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने लावण्यात आले आहेत.

गेल्या वर्षीही कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊन जाहीर झाल्याने यात्रा रद्द करण्यात आली  होती. मागील आठवड्यात यावर्षीच्या यात्रेसंदर्भात   ठोस निर्णय घेण्यासाठी मंदिराचे पुजारी, पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत यंदाही मंदिर भाविकांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्ताने शिवमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे, उद्यापासून शाळा सुरु होत आहेत, बाजारपेठा सुरु झाल्या आहेत, निवडणुका घेतल्या जातात, इतर ठिकाणी मंदिरामध्ये भाविकांना जाऊ दिले जाते, मग शिवमंदिर परिसरालाच कोरोनासह संचारबंदी आणि जमावबंदीचे नियम का लावले जातात? केंद्र सरकारच्या अखत्यारीत शिवमंदिराचा समावेश आहे.  केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योग्य समन्वय साधून कोरोनाबाबतचे नियम आणि अटी घालून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देणे गरजेचे असल्याची मागणी मंदिराचे पुजारी विजय पाटील यांनी केली.