महागाईच्या झळांवर शिवसेनेची करमाफीची फुंकर

माजी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून पालकमंत्र्यांचे आभार

ठाणे: इंधन दार वाढीमुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले असताना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी जवळपास ३५ टक्के मालमत्ता कर माफी देत शिवसेनेने ठाणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. ठाणेकरांची तब्बल ५० कोटी रुपयांची बचत त्यामुळे होणार आहे, असे सांगत माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नगरविकास मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

हिरानंदानी इस्टेट येथील ५०० चौरस फुटांच्या काही मालमत्तांना १८ हजार रुपये मालमत्ता कर भरावा लागत होता. तो आता १२ हजारांवर आला आहे. या कुटुबांसाठी सहा हजारांची सवलत मोठी आहे. तसेच, काही चाळीमध्ये दीड हजारांचा मालमत्ता कर आता एक हजार रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. मालमत्ता करामध्ये मिळालेल्या या सरासरी ३५ टक्क्यांच्या कपातीचा लाभ लाखो ठाणेकर कुटुंबांना मिळणार आहे. त्यामुळेच या निर्णयाचे सर्वसामान्य ठाणेकरांकडून स्वागतच होत असल्याची माहिती नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत द्यावी असा ठराव सत्ताधारी शिवसेनेने पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. त्यानंतर हा ठराव अंतिम मंजूरीसाठी राज्य शासनाकडे धाडण्यात आला होता. हा ठराव मंजूर करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर सर्व प्रशासकीय सोपस्कार पार पाडून नगरविकास मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळेच एप्रिल, २०२२ ते मार्च, २०२३ या कालावधीसाठी ठाणेकरांना मालमत्ता कराची बिले धाडताना त्यातला सर्वसामान्य कर माफ करण्यात आला आहे. एकूण मालमत्ता कराच्या बिलात ही माफ केलेली रक्कम जवळपास ३५ टक्के आहे. पालिकेच्या तिजोरीतील मालमत्ता कराची आवक त्यामुळे ५० कोटींनी कमी होणार आहे. याचाच अर्थ सर्वसामान्य ठाणेकरांच्या खिशातून वसूल केले जाणारे ५० कोटी रुपये या सवलतीमुळे माफ झाले आहेत.

विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे
ठाणेकरांना मालमत्ताकरात मिळालेली सवलत काही विघ्नसंतोषी विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे. आपल्या पक्षाने निवडणूकीपूर्वी दिलेली किती आश्वासने माळ्यावर गुंडाळून ‘फेकली’ आहेत याचे आत्मपरिक्षण या नेत्यांनी केले तर आमच्यावर असे आरोप करण्यास ते धजावणार नाहीत असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.