शिवसेना शिंदे-ठाकरे गटात वाद उफाळला

आरोप-प्रत्यारोप आणि बॅनर फाडाफाडी

ठाणे: गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून आता बॅनर फाडण्यापर्यंत वाद टोकाचे होऊ लागले आहेत. खासदार नरेश म्हस्के आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यातील जहरी वाक्युद्धामुळे हा वाद येत्या काळात मोठ्या प्रमाणात उफाळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठाकरे गटाचे माजी खासदार आणि नेते राजन विचारे यांनी दहशतवाद्यांवरील कारवाईबाबत केलेल्या विधानावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. त्यांनी बुधवारी मध्यरात्री बॅनरबाजी करत ठाकरे गटावर तोंडसुख घेतले. याची कुणकूण लागताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे वादग्रस्त बॅनर फाडून यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांआधी ठाण्यात पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना बच्चा है वह असे म्हणून
शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी डिवचले होते. त्याला उत्तर म्हणून खासदार नरेश म्हस्के यांनी विचारे यांना ‘आजोबा’ संबोधून समाचार घेतला. पण हा वाद इथेच शांत झाला नाही. ही घटना ताजी असतानाच ‘ऑपरेशन महादेव अंतर्गत दहशतवाद्यांना ठार मारून मेहरबानी केली काय’ असे विधान माजी खासदार राजन विचारे यांनी केले. त्यामुळे शिंदे गटाच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी बुधवारी राजन विचारे यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आधी आंदोलन केले. त्यांनंतर थेट राजन विचारे यांना देशद्रोही संबोधून बुधवारी रात्री बॅनरबाजी करण्याचा प्रयत्न केला. विचारे यांच्या विरोधात आंदोलन झाल्यानंतर बुधवारी ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन यापुढे जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे विचारे विरोधात ठाण्याच्या लुईसवाडी येथे बॅनर लागल्याची कुणकुण लागताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे धडकले. त्यापूर्वी पोलिसांनी हा बॅनर हटवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला शिंदे गटाचे कार्यकर्ते न जुमानता उलट राजन विचारे यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे धडकले आणि त्यांनी बॅनर फाडले. त्यामुळे दोन्ही गटामध्ये तणाव वाढला. या घटनेचे पडसाद ठाण्याच्या राजकारणात
उमटण्याची शक्यता आहे.