१७ मूर्तिकारांना २५ टन शाडू माती मोफत, दोघांना निःशुल्क जागा

ठामपातर्फे शाडूपासून गणेशमूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा

ठाणे: ठाणे शहरातील १७ मूर्तीकारांना ठाणे महापालिकेने विनामूल्य २५ टन शाडू माती आणि चार मूर्तिकारांना विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे. तर ‘माझे घर, माझा गणपती’ या संकल्पनेनुसार शाडू मातीपासून मूर्ती घडविण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.

त्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि इतर सामाजिक संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. या कार्यशाळा सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुल्या असून त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

१४ जूनपासून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील पर्यावरण दक्षता मंडळाच्या ग्रीन शॉपी कार्यालयात आतापर्यंत १०० हून अधिक नागरीकांनी शाडू मातीपासून गणपती मूर्ती घडविल्या आहेत. अधिकाधिक नागरिकांना सहभागी होता यावे यासाठी कार्यशाळांची संख्या व ठिकाणे वाढविण्यात येत असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली.

उपवन तलाव येथील ॲम्फी थिएटर आणि शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, पोखरण रोड नं-२ या ठिकाणी देखील कार्यशाळा नियमितपणे आयोजित केल्या जाणार आहेत.

दादोजी कोंडदेव स्टेडियम, गाळा क्र. १५ येथे १७ ऑगस्टपर्यंत दररोज कार्यशाळा होत आहे. उपवन तलाव ॲम्फी थिएटर येथे १७ ऑगस्टपर्यंत केवळ शनिवार आणि रविवारी कार्यशाळा होईल. महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलजवळ, पोखरण येथे २ आणि ३ ऑगस्ट रोजी कार्यशाळा होणार आहे.

पर्यावरण शाळा या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण दक्षता मंडळाच्या सहाय्याने ठाणे महानगरपालिकेद्वारे आतापर्यंत ठामपा क्षेत्रातील विविध शाळांमध्ये तीन हजारहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणपती घडविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याबाबत जनजागृतीही करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील ठाणे शहर, डायघर, खर्डी, दिवा, मुंब्रा, बाळकुम, मानपाडा, ओवळा येथील शाळांनी या उपक्रमांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पर्यावरणपूक गणेशोत्सवासाठी ठाणे महापालिकेने याही वर्षी चार मूर्तीकारांना नि:शुल्क जागा उपलब्ध करून दिली आहे. तर, महापालिकेकडे आलेल्या अर्जाप्रमाणे १७ मूर्तीकारांना विनामूल्य २५ टन शाडू माती उपलब्ध करून दिली असल्याची माहितीही मनीषा प्रधान यांनी दिली.

विनामूल्य कार्यशाळांच्या नोंदणीसाठी पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या प्रतिनिधींशी ९९२०७७२८६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.