ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणुन घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत आनंद आश्रमात आज मंगळवार ४ मार्चपासून ‘जन संवाद’ उपक्रमाचा श्रीगणेशा केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती व माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचे निवारण यावेळी केले. दरम्यान, दर मंगळवारी आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच ठामपा संबधित नागरीकांच्या तक्रारी व समस्या सोडविल्या जाणार असल्याचे अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेचे ‘ठाणे’ ठाण्याची ‘शिवसेना’ हे ब्रीद जपत आजवर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखला आहे. या पार्श्वभुमीवर
ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जात आहेच, शिवाय शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळीनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांना दिलासा देण्यासाठी जन संवाद उपक्रमाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसुत्रीवर आधारीत शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेता मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जन संवाद उपक्रम आयोजित केला होता. या जन संवादात शिक्षण, आरोग्य, पाणी, निवारा, क्रीडा, कला, विज्ञान व सामाजिक सद्य:स्थितीतील वाद – कलह आदीसह ठाणे नगर विकास आराखड्या बाबतच्या समस्यांचे निवारण करण्यावर प्रामुख्याने भर दिला.
आनंद आश्रमात आयोजित जन संवाद उपक्रमात उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्यांचे निवेदन यावेळी सादर केले. या प्रसंगी शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख व उपशहर प्रमुख हे देखील उपस्थित होते.