ठाणे : ठाणे महापालिकेने निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या पहिल्या आराखड्यात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या एकट्या वागळे परिसरात १५ प्रभाग तयार करून ४५ नगरसेवकांची सोय करण्यात आली होती तर राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मुंब्रा येथे मात्र २४ जागा १५वर आणल्याचे उघड झाले आहे. नवीन आराखड्यामुळे राष्ट्रवादीबरोबरच भाजपा आणि इतर पक्षांचे भले होणार आहे.
ठाणे महापालिकेने पाठवलेला पहिला आराखडा ‘ठाणेवैभव’च्या हाती लागला आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगाने सुमारे ७० ते८० टक्के बदल करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ८१,४८८ गृहीत धरून १४२ जागांसाठी ४७ प्रभागांची नवीन रचना तयार करण्यात आली आहे. ही रचना करताना ११ लाख ६०,४१९ शहरी भागासाठी तर सहा लाख ८१,०६९ ही खाडीपल्याडची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली होती. लोकसंख्या भागिले १४२ जागा असे गणित केले असता शहरी भागातील जागा ८९ (८९.४८%) होतात तर ग्रामीण भागासाठी ५३ जागा (५२.५२%) असे जागावाटप करणे आवश्यक असतानाही पहिला आराखडा तयार करताना वाढलेल्या ११ जागांपैकी कळवा-मुंब्र्यातील चार जागा पहिल्या आराखड्यात कमी करून त्या ४९ ठेवल्या होत्या तर शहरी भागात ८९ जागा होत असताना त्या ९३ करण्यात आल्या होत्या, मात्र निवडणूक आयोगाच्या लक्षात ही चूक येताच त्यांनी चूक सुधारली असून शहरी भागात ९० जागा आणि ग्रामीण भागातील ५२ जागा ठेवल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने हा पवित्रा घेतल्यामुळे शिवसेनेच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. घोडबंदर आणि नौपाडा भागातील मोडतोड केलेले प्रभाग नियमानुसार करण्यात आले. त्यामुळे सर्वच पक्षांच्या सोयीचे झाले आहे. पहिला आराखडा तयार करताना राजकीय हस्तक्षेप झाला होता. त्याचा फायदा सत्ताधारी पक्षाला होणार होता, परंतु नवीन आराखड्यामुळे मात्र सर्वच पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.
दिवा परिसरातील एक जागा कमी झाल्याचे बोलले जात असले तरी त्या भागातील सदस्यसंख्या दहा होणार आहे. खर्डी आणि डवले ही गावे दिव्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. तेथील तीन सदस्यांचा एक प्रभाग वाढून येथील सदस्यसंख्या नऊवरून दहा झाली आहे. दिवा भागातील नगरसेवकांची संख्या एकने वाढली असल्याचा दावा महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे.