मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेला यश, सभापतीपदी सरनिंगे

मुरबाड: मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) निवडणुकीत शिवसेनेला निर्विवाद यश मिळाले आहे.

एपीएमसीच्या सभापतीपदी शिवसेनेचेच लक्ष्मण सरनिंगे यांची फेरनिवड झाली. तर उपसभापतीपदी शिवसेनेचेच प्रकाश व्यापारी यांची बिनविरोध निवड झाली. बाजार समितीत भाजपाचे अवघे तीन सदस्य असल्यामुळे भाजपाने निवडणूक लढविली नाही.

राज्यातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेना-भाजपा यांच्यात युतीची शक्यता होती. भाजपाला सहा जागा सोडण्यास शिवसेना तयार असतानाही, भाजपाने सात जागांचा हट्ट ठेवल्यामुळे युती तुटली होती. मात्र, निवडणुकीत भाजपाला निराशा पत्करावी लागली. एपीएमसीच्या १८ पैकी १५ जागांवर शिवसेनेचे, तर अवघ्या ३ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकीमुळे भाजपाला मोठा धक्का बसला होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे लक्ष्मण सरनिंगे, तर उपसभापतीपदी शिवसेनेचेच प्रकाश व्यापारी यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी उमेद कांबळे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या वेळी संचालक म्हणून दीपक खाटेघरे, चिंतामण फनाडे, बालकृष्ण चौधरी, सुनील घागस, अशोक भगत,धर्मा धळपे, गुरुनाथ झुंजारराव, भारती पष्टे, विद्या धारवणे, जयराम देसले, मंगल केणे, विनायक केदार, प्रवीण कोर, सुरेश बांगर, अशोक मोरे, रमेश उघडा आदींनीही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ दळवी, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, माजी नगराध्यक्ष किसन कथोरे, माजी उपनगराध्यक्ष नारायण गोंधळी, महेंद्र पवार, वसंत गडगे यांच्यासह तालुक्यातील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.