महिन्याभरात शिवसेनेला उत्तर मिळणार; कल्याणमध्ये सोमय्या यांची पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीका

कल्याण: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. १९ बंगल्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, काल किमान एकदा तरी पत्नी धर्म निभावणार अस वाटलं होतं, मात्र जे आपल्या पत्नीचे होऊ शकले नाहीत, ते महाराष्ट्राचे काय होणार, अशी सडकून टीका त्यांनी केली.

भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किरीट सोमय्या कल्याण येथे आले होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्या शनिवारी झालेल्या सभेवर टीका केली. किरीट यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांना महिनाभरात करारा जवाब मिलेगा, असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना सोमय्या म्हणाले आहेत की, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचा भोंगा आहेत. मालक जे बोलतात, तेच राऊत प्रवक्ता म्हणून बोलतात. संजय राऊत यांनी माझ्याबाबतीत मराठीत शिव्यांचे संशोधन केले आहे. उद्धव ठाकरे यांचं सत्य महाराष्ट्राच्या जनतेमसोर ठेवणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

सोमय्या पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं, हे सांगू शकले नाही. राज्याची वाट लावण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे. अडीच वर्षात 50 हजार कोटींचे घोटाळे केले. यांचे दोन डझन नेते भ्रष्टाचारात अडकले आहेत. मला वाटलं काल त्यांच्यावर काही तरी बोलतील. मात्र देवेंद्र फडणवीस आणि माझ्यावर व्यंग केलं, ते काय हास्य कवी सम्मेलन होत का?, असं ते म्हणाले आहेत. सोमय्या म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यात 19 बंगल्याचा घोटाळयाबात स्पष्टता करण्याची हिम्मत नाही. माझी तीनदा सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला.