शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा राजीनामा

डोंबिवली : शिवसेना फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी कायम राहिलेले डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

डोंबिवलीत थरवळ यांची उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. त्यामुळेच कठीण काळात थरवळ यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी टाकली होती. मात्र बुधवारी अचानक सदानंद थरवळ यांनी कल्याण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने शहरात हा विषय चर्चेचा झाला आहे.

सदानंद थरवळ यांनी उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, साहेब आपण २७ जुलै २०२२ रोजी कल्याण लोकसभेतील डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदार संघासाठी माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. तेव्हांपासून मी
शक्य तेवढा संघटना वाढीसाठी प्रयत्न केला. परंतु आपल्याला अपेक्षित असलेले काम माझ्याकडून होत नाही असे मला वाटते त्यामुळे मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.

कल्याण जिल्हाप्रमुख पदासाठी सर्वात जुना चेहरा म्हणून थरवळ यांच्याकडे पाहिले जाते. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत डोंबिवलीतून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होत होती. थरवळ हे जिल्ह्यातील कणखर नेतृत्व होते. पक्षाचे दोन गट झाल्यानंतर थरवळ हे डोंबिवलीत झालेल्या एका राजकीय कार्यक्रमात ढसाढसा रडले होते. थरवळ यांनी एकीकडे जिल्ह्याचे नेतृत्व तर दुसरीकडे पक्ष वाढीसाठी दिलेला जोर शिवसेना (उबाठा) पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. मात्र थरवळ यांच्या जिल्हाप्रमुखाच्या राजीनाम्यानंतर पुढे काय अशी राजकीय क्षेत्रात विचारणा होऊ लागली आहे.

याबाबत थरवळ यांनी स्पष्ट सांगितले की, मी शेवटपर्यंत शिवसैनिकच राहणार आहे. आता उद्धव ठाकरे थरवळ यांचा राजीनामा स्वीकारतील की पुन्हा त्यांची समजूत काढतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.