अंबरनाथमध्येही शिवसेनेला हादरा

२० माजी नगरसेवकांसह पदाधिकारी शिंदे गटात

अंबरनाथ : अंबरनाथमध्येही शिवसेनेच्या सुमारे २० माजी नगरसेवक, नगरसेविकांसह असंख्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याचा  दावा केल्याने शिवसेनेला जबरदस्त हादरा बसला आहे.

ठाणे येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची आमदार डॉ. बालाजी किणीकर, उप शहरप्रमुख परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी अंबरनाथचे दोन माजी उप नगराध्यक्ष याशिवाय नगरसेवक, नगरसेविकांनी तसेच दोन स्वीकृत नगरसेवकांसह, दोन उपशहरप्रमुख आदींनी पाठिंबा दर्शवल्याचा दावा करण्यात आला आहे.

अंबरनाथमध्ये ५७ नगरसेवक असून दोन अपक्ष नगरसेवकांसह शिवसेनेचे २५ संख्याबळ होते, त्यातील सुमारे १९ ते २० नगरसेवकांसह भाजपातून शिवसेनेत आलेल्या माजी दोन नगरसेवकांनी आणि शिवसैनिकांनी  मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे. या निर्णयामुळे शहरात शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. १७ मे २०२० रोजी नगरपालिकेची मुदत संपली होती. १९ मे २०२० पासून नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे.

दरम्यान शिवसेनेतील घडामोडींबाबत योग्य वेळ आल्यावर भूमिका स्पष्ट करू असे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्पष्ट केले.