विधानसभेसाठी शिवसेना सज्ज

मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेचे मंत्री, आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्वात यशस्वी पक्ष ठरल्याने विधानसभेला जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी आग्रही मागणी आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीत पक्षाकडून महत्वाच्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक निरिक्षक आणि प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार खासदारांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्देश दिले आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देणे, विधानसभानिहाय मतदार संघांचा सर्व्हे करणे, युवा सेना आणि महिला आघाडीमध्ये नवीन सदस्य नोंदणी प्राधान्याने करणे, सरकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या मतदार संघाचा स्थानिक आमदारांकडून आढावा घेतला. त्यांना मतदार संघावर लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. ही निवडणूक महायुतीत लढणार असल्याने आपसांत एकमेकांवर टीका करणे टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आजच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विधानसभानिहाय मतदार संघावर पक्षाकडून निवडणूक निरिक्षक आणि प्रभारींची नियुक्ती केल्याची माहिती शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत १५ पैकी ७ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. शिवसेनेचा स्ट्राईक रेट ४७टक्के इतका होता. शिवसेनेच्या १५ उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत ७४ लाख मते मिळाली. शिवसेनेचा १९ टक्के मूळ मतदार असून त्यापैकी १४.५% मतदार धनुष्यबाणाकडे कायम राहिला. या निकालानंतर राज्यातील शिवसेना आमदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने जास्तीत जास्त जागा लढवाव्यात, अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली आहे.