रवींद्र धंगेकरांना शिवसेनेची ऑफर

पुणे: रवींद्र धंगेकर यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍समधील फोटोत त्यांनी गळ्यात भगवे उपरणे परिधान केल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे हे स्टेट्‍स चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय? याबाबत अनेकांनी सवाल उपस्थित केले. मात्र, आता यावर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी आज (२३ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना एक मोठे विधान करत रवींद्र धंगेकर यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले.

“रवींद्र धंगेकर यांनी काल गळ्यात भगवे उपरणे परिधान केलेला फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्‍सला ठेवला होता, असे मी पाहिले. त्याबाबत मी काल बोललो की त्यावर धनुष्यबाण आला तर आम्हाला आवडेल. तसेच मी कालच रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण दिले आहे. कारण त्यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर ताकदीने काम करायचे असेल आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचे असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही, असे मी त्यांना निमंत्रण दिलेले आहे”, असे उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. रवींद्र धंगेकर यांनी अचानक घेतलेल्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना आपण वैयक्तिक कामाच्या संदर्भात भेट घेतल्याचे स्पष्टीकरण रवींद्र धंगेकर यांनी दिले होते. “माझ्या वैयक्तिक कामासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या वैयक्तिक कामाचे स्वरुप सांगितले, तेव्हा ते काम करून देतो बोलले. त्यांच्याकडे काम असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची गरज पडली”, असे रवींद्र धंगेकर तेव्हा म्हणाले होते.