* ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघांत २४४ पैकी फक्त ३३ उमेदवार महिला
* भाजप, मनसेचे प्रत्येकी दोन महिला उमेदवार
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभांमध्ये एकूण २४४ उमेदवार मैदानात आहेत. मात्र या यादीमध्ये दोन विद्यमान महिला आमदारांसह केवळ ३३ रणरागिणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या चारही गटांनी कोणत्याच मतदारसंघात महिला इच्छूकाला संधी दिलेली नाही. तर भाजप आणि मनसेच्या प्रत्येकी दोन असे चार महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महिलांना गृहीत धरत उमेदवारी देण्यात आखडता हात घेण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेल्या २४४ उमेदवारांच्या तुलनेत केवळ ३३ महिलाच आहेत. यामध्ये मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार गीता जैन आणि बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा समावेश आहे. गेल्यावेळी कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन महिला कार्ड खेळणार्या शिवसेना ठाकरे गटाने एकही महिला उमेदवार दिलेला नाही.
ठाणे जिल्ह्यात पहिल्यापासून मातब्बर पुरूषी राजकारण सक्रीय राहिले आहे. महापालिकांमध्ये ५० टक्के आरक्षण असल्यामुळे आणि महापौर पद आरक्षित होत असल्यामुळे महिला राजकारण केवळ चाकोरीपुरतेच मर्यादित राहिले आहे. पण लोकसभा, विधानसभा निवडणुकांची वेळ येताच सर्वच मोठ्या पक्षांची पहिली पसंती ही पुरुष उमेदवारांनाच असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या अहिल्याबाई रांगणेकर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर बेलापूरमधून मंदा म्हात्रे सलग दोन वेळा निवडून आल्या. २०१४ साली उल्हासनगर येथून पप्पू कलानी यांच्या पत्नी ज्योती कलानी निवडून आल्या होत्या. २०१९ साली पहिल्यांदाच दोन महिला आमदार निवडून येत त्यांनी आपली ताकद दाखवली आहे. या दोन्ही विद्यमान आमदार निवडणुकीच्या रणांगणात पुन्हा उतरल्या आहेत. यावेळी त्यांच्यासमोर मातब्बर प्रतिस्पर्धी आहेत. त्यांना पक्षांची ताकद आहे, त्यामुळे त्यांच्यासमोरही मोठे आव्हान आहे.
जिल्ह्यातील १८ पैकी चार मतदारसंघांमध्ये एकही महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी राहिलेली नाही. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेला कोपरी- पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, भिवंडी पूर्व व ऐरोली या मतदारसंघांत एकही उमेदवार दिसत नाही.
उमेदवारीसाठी किंवा निवडणूक लढवण्यासाठी महिला उदासिन असल्या तरी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य त्यांच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हयात एकूण ७१ लाख ५५ हजार ७२८ मतदार आहेत. त्यापैकी महिला मतदारांची संख्या ही तब्बल ३३ लाख ४१,०७० इतकी आहे.
महिला उमेदवारांची यादी
एकूण ३३
भाजप-२: मंदा म्हात्रे आणि
सुलभा गायकवाड
मनसे-२: वनिता कथोरे आणि
संगीता चेंदवनकर
शिवसेना शिंदे गट- ०
शिवसेना ठाकरे गट- ०
राष्ट्रवादी शरद पवार गट- ०
राष्ट्रवादी अजित पवार गट- ०
इतर पक्ष- १०
रजनी देवळेकर-समता पार्टी, ममता वानखेडे-बसपा, सुशिला कांबळे-बसपा (आंबेडकर), पूजा वाल्मीकी-बविआ, सयानी दिलीप-नागरिक विकास पार्टी, नाज खान-बहुजन महा पार्टी, अरुणा कोहली (चक्रे)-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्रिशला कांबळे-बसपा (आंबेडकर), शालिनी वाघ-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), सोनिया इंगोले-वंचित बहुजन आघाडी
अपक्ष-१९
विद्यमान आमदार गीता जैन, स्नेहा पाटील (भाजप बंडखोर), मनीषा ठाकरे, रमा शेंडे उर्फ रुपाली आरज, रंजना उघडा, अस्मा चिखलीकर, या पंचशिला खडसे, प्राजक्ता येवले, अपर्णा जाधव, सुजाता गायकवाड, संगिता गुप्ता, मंदा म्हात्रे, शर्मिला पडिये, ज्योत्सना हांडे, आरती भोसले, प्रियांका मयेकर, अश्विनी गंगावणे, सरिता मोरे, रेखा रेडकर