शिवसेनेने टँकर लॉबीला पोसले; ठाणेकर पाण्यावाचून तडफडले

आमदार संजय केळकर यांचा आरोप

ठाणे : न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे ठाणेकरांसाठी पाण्याची व्यवस्था केली नाहीच, उलट सत्ताधारी शिवसेनेने टँकर लॉबीला पोसून ठाणेकरांना पुरेशा पाण्यापासून वंचित ठेवल्याचा स्पष्ट आरोप ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.

गोवा निवडणुकीचे काम आटोपून परतलेले आमदार संजय केळकर गेले दोन ठाणे शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. या दौऱ्यात घोडबंदर, वागळे, वर्तकनगर आदी भागातील नागरीकांनी त्यांच्याकडे पाणी टंचाईच्या समस्येचे गाऱ्हाणे मांडले. याबाबत आ. केळकर यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या संशयास्पद भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

ठाण्यातील पाणीप्रश्न हा शिवसेनेचा जुमला आहे. अत्यावश्यक सेवाही शिवसेना पुरवू शकली नाही. २०१७ साली न्यायालयात एका पिटीशन प्रकरणी ठाणे महापालिका अधिकाऱ्यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आवश्यक सुविधांसह पाण्याची पुरेशी व्यवस्था केल्यानंतरच बांधकामांना परवानग्या देऊ, असे ठामपा प्रशासनाकडून त्यात वचन देण्यात आले होते, मात्र तरीही एकीकडे बांधकामांना परवानगी देताना पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याबाबत टाळाटाळ झाली. त्यातून निर्माण झालेल्या पाणी समस्येस विकासाची नुसती स्वप्नं रंगावणारी सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप श्री. केळकर यांनी केला आहे.

पाणीटंचाई भेडसावत असताना पाण्याचे मीटर बसवले जात आहेत. हे मीटर सदोष असल्याने पूर्वीपेक्षा अनेकपट जास्त बिले सर्वसामान्य ग्राहकांना मिळत आहेत. पाणीपट्टी भरूनही अनेक गृहसंकुले पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. परिणामी दर महिन्याला लाखो रूपये खर्च करून खासगी टँकरद्वारे पाणी मिळवत आहेत. लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यायचे की टँकर लॉबीला पोसायचे हा खरा मुद्दा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेना ठाणेकरांना क्लस्टर आणि हजारो कोटींच्या योजनांची खोटी स्वप्ने दाखवत आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवसेना ठाणेकरांना धरणाचे आश्वासन देत आहे. हे आश्वासन आजतागायत शिवसेनेने पूर्ण केलेले नाहीच शिवाय न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राची अंमलबजावणीही करत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेच्या न्यायालयात ठाणेकर शिवसेनेला माफ करणार नाहीत, असा इशाराही श्री. केळकर यांनी पाणी टंचाईग्रस्त लाखो ठाणेकरांच्या वतीने दिला आहे.