भिवंडीत शिवसेना-भाजपने केला कॉंग्रेसचा पराभव

स्थायी समितीत संजय म्हात्रे यांचा विजय

भिवंडी : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करत भिवंडीत कॉंग्रेसचा पराभव केला. भिवंडी स्थायी समितीच्या निवडणुकीत विरोधात असलेल्या या दोन्ही पक्षांनी एकत्र येत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे.

भिवंडी महानगरपालिका सभागृहात झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय म्हात्रे विजयी झाले तर, काँग्रेसचे उमेदवार अरुण राऊत यांचा पराभव झाला. म्हात्रे यांना 14 तर राऊत यांना दोन मते मिळाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाला गटनेत्याने केराची टोपली दाखवल्याने काँग्रेस उमेदवाराला पराभव पत्करावा लागला, असा आरोप अरूण राऊत यांनी केला आहे.

ऑनलाईन पद्धतीने पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यात 16 सदस्य असलेल्या स्थायी समिती सभागृहात शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या सहा, कोणार्क विकास आघाडीच्या दोन आणि भाजपच्या चार सदस्यांनी मतदान केले. तर काँग्रेसच्या अरुण राऊत यांना त्यांच्यासह रिषिका राका या दोनच सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे बहुमत असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस गटनेता हलीम अन्सारी यांना काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांना मतदान करण्यसाठी पक्षादेश काढण्याचे लेखी आदेश दिले होते. तरीही स्वतः स्थायी समिती सदस्य असणाऱ्या हलीम खान यांनी पक्षादेश काढणाच्या आदेशास केराची टोपली दाखवत गटनेत्यासह सहा काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात आपले मतदान केले.  मागील दोन-अडीच वर्षात संबंध दुरावल्याने टोकाचा विरोध सुरु असलेल्या शिवसेना-भाजपा यांच्यात या निवडणुकीच्या निमित्ताने समेट घडलेला पाहायला मिळाला. भाजपच्या चार सदस्यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने सर्वच अचंबित झाले आहेत.

भिवंडी महानगरपालिका सभागृहात काँग्रेस बहुमताने सत्तेत असताना काँग्रेस पक्षाचा पराभव घोडेबाजारीच्या बंडखोरीतून झाला असून त्यामध्ये मोठे आर्थिक हितसंबंध जोपासले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या काँग्रेस गटनेत्यासह सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया पराभूत काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांनी दिली आहे.  काँग्रेस पक्षाला शिवसेनेने मदत केल्यामुळेच मागील वर्षी शिवसेनेच्या वाट्याला आलेले स्थायी समिती सभापती पद या काळात  कायम राहावे, यासाठी काँग्रेससह भाजपने मतदानातून आपल्याला शहराची सेवा करण्याची पुन्हा संधी दिली, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार संजय म्हात्रे यांनी दिली आहे.