शिवसेना-भाजपची युती नैसर्गिक

महापौर नरेश म्हस्के यांचे राष्ट्रवादीवर पुन्हा दबावतंत्र

ठाणे : ठाणे महापालिकेत एकीकडे आघाडीसाठी ठाण्यातील दोन्ही मंत्री प्रयत्नशील असताना दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी मात्र थेट भाजपलाच अवताण दिले असल्याने ठाण्यात वेगळ्या राजकीय चर्चा घडू लागल्या आहेत. हे अवताण प्रत्यक्षात देण्यात आले नसले तरी म्हस्के यांनी या टर्ममधील शेवटच्या महासभेतील आपल्या भाषणात शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक असून असे नाते तुटत नसल्याचे जाहीर करत स्थानिक पातळीवर भाजपचाही पर्याय असल्याचे सूतोवाच करून राष्ट्रवादीवर पुन्हा एकदा दबावतंत्राचा वापर केला आहे.

ठाणे महापालिका नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आता ५ मार्च रोजी संपुष्टात येणार असून महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या शेवटच्या महासभेत महापौरांनी भाजपचे गोडवे गातांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर शालजोडीतले टोले लगावले. नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे म्हस्के यांनी काही दिवसांपुर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी मारली होती. तर भाजपच्या नगरसेवकांनी मात्र कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हाच धागा पकडत म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टोले मारले. राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांना स्नेह भोजनाला यायचे होते. परंतु वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे येऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लगावला.

महाविकास आघाडीतील मित्र कार्यक्रमाला आले नसले तरी भाजपचे सर्व नगरसेवक मात्र कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती होती. भांडणे होऊन घरातून बाहेर पडलो तरी नाते तुटत नसते, असे विधान त्यांनी केल्याने नव्या चर्चेला आता उधाण आले आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात काही प्रस्थापित नगरसेवकांची मक्तेदारी होती. त्यांना वाटायचे आपल्याशिवाय इतर कोणीच बोलू नये. सर्वच बाबतीत त्यांचीच मक्तेदारी होती. त्यामुळे महापौर झाल्यानंतर प्रस्थापितांना ठरवून धक्का दिला आणि नव्या नगरसेवकांना पुढे येण्याची संधी दिल्याचे सांगत त्यांनी त्यांचे राष्ट्रवादीमधील मित्र नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आदींसह इतर प्रस्थापित नगरसेवकांना टोला लगावला. कोरोना काळात सत्ताधारी पक्ष असल्यामुळे पक्षावर टिका होत होती. परंतु हाडाचा शिवसैनिक असल्यामुळे सर्वांना अंगावर घेतले. तसेच स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होऊ दिला नाही. हे सर्व करताना मैत्रीही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचे महापौरांनी आपल्या भाषणात सांगितले.