ठाण्यातून शिवसैनिक अयोध्येला रवाना

ठाणे: ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर या शहराबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्याला ठाणे, कल्याण या रेल्वे स्थानकातून रवाना झाले.

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे रेल्वे स्थानकात युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी झेंडा दाखवून रेल्वे अयोध्येकडे रवाना करण्यात आली. त्यावेळी ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, उपशहर प्रमुख जगदीश थोरात, प्रकाश शिंदे, एकनाथ भोईर, बबन मोरे, युवा व राहुल लोंढे, युवा अधिकारी नितीन लांडगे, निखील बुडजडे, सुनील पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१५ जून रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता शरयू नदीच्या काठावर महाआरती करून शिवसैनिक परतीचा प्रवास करणार आहेत, अशी माहिती खासदार राजन विचारे यांनी दिली.